आनंद दिघेंचा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला अशासारख्या घोषणांचा रतीब मांडत गेली अनेक दशके ठाण्यात केवळ अस्मितेचे राजकारण करण्यात दंग असलेल्या शिवसेनेला ठाण्यातील नवमतदारांनी सपशेल नाकारल्याचे चित्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठसठशीतपणे पुढे आले आहे. नौपाडा, पाचपाखाडी, चरई, टेंभी नाका अशा बालेकिल्ल्यांमधील शिवसेनेचा जनाधार यंदा कमी झाल्याचे चित्र दिसत असले तरी नव्या विकसित होत असलेल्या घोडबंदर, लोकपुरम, माजीवडा, वसंत विहार यासारख्या वस्त्यांमधून शिवसेनेला भविष्यात कडवे आव्हान उभे राहू शकेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नावाने घातली जाणारी भावनिक साद ठाण्यातील या नवमतदारांना यापुढे आकर्षित करू शकेल का, असा प्रश्न आता सेनेतील काही वरिष्ठ नेते दबक्या सुरात उपस्थित करु लागले आहेत.
ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ांमधील २४ विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेची चांगली ताकद असली तरी या ताकदीचे विजयात रूपांतर करणे स्थानिक नेत्यांना जमलेले नाही. ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ अशा शहरांमध्ये शिवसेनेची वर्षांनुवर्षे सत्ता आहे. मात्र तेथील स्थानिक संस्थांमधील कुशासनाचे अनेक नमुने यापूर्वी पुढे आले आहेत. कल्याण-डोंबिवली शहराचे तर गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणावर बकालीकरण झाले असून ठाण्यातही विकासाच्या नावाने फार काही समाधानकारक चित्र नाही. शिवसेनेचे ठाण्यातील सर्वेसर्वा म्हणविले जाणारे संपर्क प्रमुख आमदार एकनाथ िशदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात मागील पाच वर्षांत कोणती ठोस विकासकामे झाली या प्रश्नाचे उत्तर अद्याप गुलदस्त्यातच आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात सॅटिससारखा (या प्रकल्पातही अनेक चुका आहेत) एखादा प्रकल्प ऊभारून स्वत:ची पाठ थोपटवून घेणारे शिवसेना नेते कागदावर राहिलेल्या प्रकल्पांविषयी मात्र राज्य सरकारकडे बोट दाखविण्यात धन्यता मानतात. स्थायी समितीमधील टक्केवारीच्या राजकारणामुळे आपल्या मतदारसंघातील अनेक विकासकामे रखडवून ठेवल्याचा आरोप खुद्द शिवसेनेच्या एका आमदाराने केला आहे. त्यामुळे निवडणुका आल्या की नेहमीच स्थानिक अस्मितेची कास धरणाऱ्या शिवसेनेपुढे आगामी काळात मोठे आव्हान उभे राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
पोकळ अस्मितेला नवमतदारांचा ठेंगा
गेल्या दशकभरात ठाणे शहराचा झपाटय़ाने विकास झाला असून घोडबंदर पट्टय़ात काही लाखांच्या संख्येने नवे मतदार निर्माण झाले आहेत. नौपाडा आणि आसपासचा परिसर तसेच वागळे इस्टेटमधील बेकायदा वस्त्यांमधील रहिवाशी हे शिवसेनेचे हक्काचे मतदार मानले जातात. वागळे परिसरातील अमराठी वस्त्यांमध्येही शिवसेनेला चांगले मतदान होत असते. बेकायदा पायावर उभ्या राहिलेल्या इमल्यांना संरक्षण देणारे अस्मितेचे राजकारण त्यास कारणीभूत असल्याचे उघड आहे. मात्र ठाण्यात नव्याने रहावयास येत असलेल्या सुशिक्षित मतदारांना अस्मितेच्या या पोकळ गप्पा फारशा प्रभावित करत नसल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत घोडबंदर पट्टय़ातून भाजपने मोठी मुसंडी मारत शिवसेनेवर तब्बल पाच हजार मतांची आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ढोकाळी, बाळकूम यासारख्या पट्टय़ात राष्ट्रवादीचे नगरसेवक असतानाही भाजपला तेथून ४४९२ तर शिवसेनेला २४५६ मते मिळाली आहेत. नव्याने विकसित झालेल्या लोढा, कल्पतरू, दोस्ती, रुस्तमजी, हिरानंदानी अशा मोठय़ा वसाहतींमध्ये शिवसेनेचे उमेदवार सर्वच ठिकाणी मागे पडल्याचे चित्र आहे. ठाणे शहरातील हक्काच्या प्रभागांमध्ये शिवसेना पिछाडीवर पडली असली तरी नव्याने विकसित होत असलेल्या ब्रह्मांडसारख्या वसाहतींमधून उमेदवार पिछाडीवर पडल्याने सेनेच्या वर्तुळात चिंतेचे सूर उमटू लागले आहेत. वर्तकनगर पट्टय़ातील वसंत विहारसारख्या भागातही सेनेसाठी धोक्याची घंटा वाजू लागली आहे.
ठाणे शहराला राजकीय अस्मितेचा वारसा असल्याने निवडणूक प्रचारात हे मुद्दे अग्रभागी येणे स्वाभाविक आहे, असे मत शिवसेनेतील एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. ठाणे शहरात गेल्या २० वर्षांत विकासकामे झालीच नाहीत का, असा सवालही या पदाधिकाऱ्याने उपस्थित केला. घोडबंदरसारख्या नवमतदारांच्या पट्टय़ातही शिवसेनेला चांगले स्थान आहे हे यापूर्वी स्पष्ट झाले आहे. तरीही विकासकामांचे आराखडे घेऊन यापुढे या मतदारांना सामोरे जावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.