राज्यात पहिल्या दोन टप्प्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत १० ते १२ टक्के वाढ झाल्याने मुंबईतील मतदानाचा टक्का किती वाढेल याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. मतदानाकडे पाठ फिरवण्याची मुंबईकरांची सवय पाहता यंदा मतांचा टक्का उर्वरित महाराष्ट्राप्रमाणे दहा ते १२ टक्क्यांनी वाढण्याबाबत साशंकता असली तरी मोदी लाट आणि मतदार जागृतीच्या जोरदार मोहिमेचा मुंबईकरांवर काय परिणाम होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
गेल्या तीन सार्वत्रिक निवडणुकांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास मुंबईतील मतदानाची टक्केवारी सरासरी ४० ते ४२ टक्क्यांपर्यंतच आहे. २००९च्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबईतील मतांची टक्केवारी सरासरी ४० टक्केच होती. सहा महिन्याने झालेल्या विधानसभा निवडणुकीतही मुंबईत ४५ टक्क्यांच्या आसपासच मतदान झाले होते. दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी मतदान वाढेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण तेव्हाही मतदानाचा टक्का ५० टक्क्यांच्या आतच राहिला. एकूणच मुंबईत मतदानाची टक्केवारी वाढत नाही, असा अनुभव आहे.
देशात आतापर्यंत झालेल्या पाच टप्प्यांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली आहे. राज्यात नागपूर, पुणे आदी शहरांमधील मतदानात गतवेळच्या तुलनेत १५ टक्क्यांनी वाढ झाली. राज्यातील सुमारे ५० लाख नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याने मतदानाची टक्केवारी वाढली, असा दावा करण्यात येत असला तरी एकूणच मतदारांचा उत्साह वाढला आहे. देशात आतापर्यंत पाच टप्प्यांमध्ये सरासरी ६० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. ही पाश्र्वभूमी लक्षात घेता मुंबईतही मतदानाची टक्केवारी वाढेल, अशी शक्यता व्यक्त केली जाते. मुंबईत मुस्लिम आणि गुजराती मतदार मतदानाला बाहेर पडण्याचे टाळतात, असा अनुभव सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना येतो. नरेंद्र मोदी यांच्यामुळे गुजराती मतांची टक्केवारी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोदी यांच्यामुळे झालेल्या मतांच्या ध्रुवीकरणाची प्रतिक्रिया म्हणून मुस्लिम मतांची टक्केवारीही वाढू शकते. कारण विदर्भ आणि मराठवाडय़ात मुस्लिम समाजातील मतदानाची टक्केवारी वाढली आहे. शाळेला सुट्टय़ा लागल्याने मोठय़ा प्रमाणावर मुंबईकर बाहेरगावी गेले आहेत. त्याचा परिणाम मतदानावर नक्कीच होऊ शकतो. एकूणच मुंबईतील मतदानाचा टक्का यंदा किती वाढतो वा नेहमीप्रमाणे कमीच राहतो हा उत्सुकतेचा विषय आहे.

२००९ मध्ये मुंबईत झालेल्या मतदानाची टक्केवारी
उत्तर मुंबई (४२.६२ टक्के), उत्तर-पश्चिम (४३.९२ टक्के), ईशान्य मुंबई (४२.३७ टक्के), उत्तर-मध्य (३९.६३ टक्के), दक्षिण- मध्य (३९ टक्के), दक्षिण मुंबई (४० टक्के).