सिडको वसाहतींमध्ये आरोग्याचा पुरता बोजवारा उडाला आहे. धड ना जिल्हा परिषद ना नगरपालिका अशा दुष्टचक्रात सिडको वसाहतीमधील रहिवासी अडकल्याने सिडकोच्या कारभाराविषयी अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
 कळंबोली येथील सेक्टर-१ येथील सत्यसंस्कार सोसायटीमधील १२५ सदनिकांमधील ८० जणांना नोव्हेंबर महिन्यात काविळीची बाधा झाली होती. सोसायटीमधील मलनि:सारण वाहिनीच्या गळतीमुळे थेट पाण्याच्या टाकीत मल गेल्याने या सोसायटीमधील नागरिकांना हे मलमिश्रित पाणी प्यावे लागले. अनेक जण या साथीच्या आजारातून बरे झाले. मात्र आजही या सोसायटीमधील काविळीच्या खुणा ओसरल्या नाहीत. अकरावीत शिकणारा दीपक करवंदे हा विद्यार्थी गेल्या अकरा दिवसांपासून कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. दीपक हा सध्या काहीही बोलत नाही. कुणाला ओळखत नाही. कोणतीही हालचाल करीत नाही. अशा अवस्थेत त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सत्यसंस्कार इमारतीच्या विकासकांनी इमारत बांधते वेळी पाण्याची टाकी आणि मलनि:सारण वाहिनी यामध्ये एक फुटाहून कमी अंतर ठेवले आणि पाण्याची टाकीही निकृष्ट दर्जाची बांधली. त्यामुळे मलनि:सारण वाहिनीमधील मल पाण्याच्या टाकीत मिसळले. गेले अनेक महिने या इमारतीमधील रहिवासी हेच पाणी पीत होते. सिडकोने या गंभीरप्रकरणी केवळ कागदोपत्री सर्वे केला. मात्र नागरिकांना कोणतीही आरोग्याची सुविधा पुरविली नाही. रायगड जिल्हा परिषदेची ही जबाबदारी असल्याचे सिडकोच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात येते. मात्र आरोग्याशी खेळणाऱ्या विकासकांना कायदेशीर दर्जेदार इमारत बांधण्याची परवानगी सिडकोचे शहर नियोजन विभागाकडून दिले जाते. सिडकोची जबाबदारी फक्त पाणी, रस्ते, गटारे याच पायाभूत सुविधांची आहे का, असा प्रश्न या इमारतीमध्ये राहणारे तानाजी यमगर हे विचारत आहेत. नऊ वर्षांपूर्वी भोगवटा प्रमाणपत्र दिलेल्या इमारतीच्या विकासकाला सिडकोच्या अभियंत्यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिलेच कसे, असा प्रश्न सत्यसंस्कार सोसायटीमधील रहिवाशांना पडला आहे.
’ दीपकच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्याची आई पुष्पा निवृत्तिवेतनावर घर चालवते. एमजीएम रुग्णालयात ११ दिवसांपासून दीपकवर त्यांनी ४० हजार रुपये खर्च केला आहे. सोसायटीतील रहिवाशांनीही लोक वर्गणी काढून दीपकसाठी मदतीचा हात पुढे केला. मात्र सिडकोच्या आरोग्य विभाग मात्र उदासीन आहे. एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरांनी नाव न छापण्याच्या अटीवर दीपकला सुरुवातीला कावीळ झाली होती. त्यानंतर त्याला ज्वर आला. आता त्याच्यावर मेंदूला रक्तपुरवठा करणारी नस बंद झाल्याने उपचार सुरू असल्याचे सांगितले. तो सध्या काहीही बोलत नाही. हालचालही करीत नाही. काविळीतही त्याने वेळीच उपचार घेतले नाही.
टाकीची दुरुस्ती आवश्यक
सिडकोचे आरोग्य विभागातील नंदकिशोर परब म्हणाले, की आम्ही नोव्हेंबर महिन्यात या सोसायटीची तक्रार आल्यानंतर पाहणी केली होती. जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही पाहणी करून सर्वेक्षण केले. पाण्याच्या टाकीतील गळतीमुळे ही दुर्घटना घडली. परंतु सत्यसंस्कार इमारतीचे विकासक आणि सोसायटीमधील रहिवासी यांच्या आपसातील अंतर्गत समन्वय साधून या टाकीची दुरुस्ती करून घेणे गरजेचे आहे.
विकासकाला नोटीस देणार
सत्यसंस्कार सोसायटीचे अध्यक्ष प्रल्हाद कुंभार म्हणाले, विकासक महेंद्र पटेल यांनी पाण्याची टाकी बांधून देऊ शकत नाही, असे सांगितले आहे. रहिवाशांच्या आरोग्याशी निगडित प्रश्न आहे. विकासकाने हात वर करून जमणार नाही. आज करवंदे कुटुंबावर वेळ आहे, उद्या इतरांवर येऊ शकते, त्यामुळे लवकरच विकासकाला नोटीस बजावण्यात येईल.