उल्हासनगरमधील यशवंत विद्यालयातील दीड हजार विद्यार्थ्यांनी आवाजाचे, प्रदूषण करणारे फटाके न वाजविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदूषणामुळे पर्यावरणाची मोठय़ा प्रमाणात हानी होत असून विस्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशाचे नागरिक म्हणून प्रदूषणाच्या तडाख्यातून पर्यावरणाला वाचविण्यासाठी विद्यार्थ्यांनी हा निर्णय घेतला आहे. फटाक्यांच्या खरेदीवर पैसे खर्च न करता ते पैसे सामाजिक कार्यासाठी, सामाजिक संस्था आणि शाळेतील उपक्रमांसाठी खर्च करण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. उल्हासनगर कॅम्प क्र. ४ मध्ये यशवंत विद्यालय आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम याची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना पर्यावरणाशी मैत्री साधणारी दिवाळी साजरी करण्यास उद्युक्त करणारी शपथ देण्यात आली असे मुख्याध्यापिका वासंती भंगाळे, गुलाब गवादे यांनी सांगितले.