ऐरोली सेक्टर १७ येथील टपाल कार्यालय समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, पोस्टात येणाऱ्या नागरिकांना तसेच एजंटाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
ऐरोली सेक्टर १७ येथे टपाल कार्यालयाचे काम नवीन व अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना व एजंटांना सकाळी ९.३० वाजल्यापासून दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत ताटकळत उभे राहून काम करावे लागते. कार्यालयातील कर्मचारी हे नागरिकांशी अरेरावी पणे बोलत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. विजेचा लंपडाव, संगणक यंत्रणा संथगतीने चालणे, विजेचा धक्का लागणे असे प्रकार येथे घडत असतात. कर्मचारी नवीन आहे, आम्ही आमचे काम करतो .. तुम्ही शिकवू नका.. तुम्हाला कुठे तक्रार करायची आहे तिकडे करा आम्ही अशाच पद्धतीने काम करू अशी अरेरावीची भाषा कर्मचारी करत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
आर.डी, किसान पत्र, नवीन खाते उघडणे आदी कामांत विनाकारण आर्थिक भरुदड सहन करावा लागतो. वेळेत पैसे भरायला येऊनदेखील अशा प्रकाराचा दंड का भरावा असा प्रष्टद्धr(२२४)्ना एजंट शकुंतला चव्हाण यांनी उपस्थित केला. एकाच वेळी सर्व ग्राहकांचे पैसै घेण्यास टाळाटाळ केली जाते. एकाव़ेळी एकाचेच पैसे घेतले जातील असा दंडक असल्याने असे केल्यास पुन्हा पुन्हा रांगेत उभे राहण्याचे काम केले तर पूर्ण दिवस यांमध्येच जाईल. मग उर्वरित कामे कधी करणार असा सवाल एजंट सुनीता साखरदंडे यांनी उपस्थित केला.
कामाच्या संथगतीपणामुळे काही कार्यालयात जाऊनही पुन्हा घरी जाण्याची वेळ आली आहे. ऐरोली सेक्टर ९ वरून सेक्टर १७ येथील कार्यालयात येण्यासाठी त्यामुळे नेहमी आर्थिक भरुदड सहन करावा लागतो अशी ज्येष्ठ नागरिक विजया गावकर यांची तक्रार आहे. आम्ही एजंट या संदर्भात पनवेल येथील कार्यालयात जाऊन तक्रारी केल्यांनतर फक्त आश्वासन देण्यात येतात. तक्रार करण्यासाठी पनवेल येथील कार्यालयात दूरध्वनी केला असता अधिकारी नसल्याचे कारणे सांगून बोलणे टाळतात अशी व्यथा एजंटांनी मांडली आही. या संदर्भात ऐरोली टपाल कार्यालयातील कर्मचारी नाव न छापण्याच्या अटीवर म्हणाले की, येथे कर्मचारी कमी आहेत व एजंट एका वेळी १० हून अधिक जणांचे काम घेऊन येत असल्याने जास्त प्रमाणात वेळ लागतो. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशावरून पहिले नागारिकांचे काम करायचे, नंतर एजंटाचे असे सांगितले आहे. कार्यालयात नवीन आलेली कार्यप्रणाली ही नवीन आलेल्या कर्मचाऱ्यांना वापरता येत नाही. त्यामुळे कामास विलंब लागत आहे. पनेवल येथील अधिकारी प्रकाश शेवाळे यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता होऊ शकला नाही.