मागील पावसाळ्यात मुंबईत सर्वाधिक चर्चेचा विषय होता तो रस्त्यांवरील खड्डय़ांचा. येत्या पावसाळ्यातही वेगळी परिस्थिती असणार नाही, याची मुंबईकरांना खात्रीच आहे. मात्र महापालिकेने एक चमत्कार केला आहे. आता मुंबईच्या सुमारे १९०० किमी रस्त्यांवर जेमतेम ५४ खड्डे शिल्लक असून तेसुद्धा दादर ते गिरगाव एवढय़ाच पट्टय़ात. उपनगरे तर खड्डेमुक्तच झाली असल्याचा अहवाल पालिकेने प्रसिद्ध केला आहे. तेव्हा आता रस्त्यावरून जाताना, रिक्षा-टॅक्सी अथवा बसमधून जाताना तुमचे सगळे अंग घुसळून निघाले, वेळप्रसंगी काही हाडमोड झाली तरी आता त्यासाठी महापालिकेला शिव्यांची लाखोली वाहू नका. आपलेच नशीब खोटे, असे म्हणून गप्प बसा. कारण ‘इतने बडे शहरमे छोटेमोटे खड्डे तो रहेंगे ही।’
पावसात रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने ‘पॉटहोल ट्रेकिंग सिस्टिम’ कार्यान्वित केली होती. मोबाइलवरून काढलेले खड्डय़ांचे छायाचित्र पालिकेला पाठविल्यानंतर तो दोन दिवसांमध्ये बुजविण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र संपूर्ण मुंबई खड्डय़ात गेली असतानाही खड्डे बुजविण्याचे काम महापालिकेला शोभेल अशा कूर्मगतीनेच सुरू होते. छायाचित्रे पाठविल्याने खड्डे काही बुजणार नाहीत आणि कोसळत्या पावसात ते बुजविले गेले तरी दुसऱ्या दिवशी ते आपल्याला ‘तोंडघशी’ पाडणारच याची पूर्ण खात्री असूनही मुंबईकरांनी मोबाईलवर छायाचित्रे पाठविण्याचा सपाटा लावला. अर्थात हे छायाचित्र विशिष्ट संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी एवढे सव्यापसव्य करावे लागत होते की त्यापेक्षा खड्डय़ात पडून हातपाय मोडून घेणे परवडले, असे नागरिकांना वाटू लागले होते. तरीही खड्डय़ांमुळे पोळलेले नागरिक पालिकेची परीक्षा पाहातच होते. त्यांच्याकडून खड्डय़ांचे फोटो पाठविण्याचा ओघ अव्याहत सुरूच राहिला.
नागरिकांच्या जोडीला पालिकेने अभियंत्यांनाही खड्डय़ांचे फोटो काढण्याच्या कामावर जुंपले. आपल्याच विभागातील खड्डय़ांचे फोटो काढून आपलीच बदनामी करून घेण्याचा हा विनोदी प्रकार होता. त्यासाठी अभियंत्यांना मोबाइलही देण्यात आले. जून ते ऑक्टोबर २०१३ या कालावधीत नागरिक, पालिका अभियंत्यांनी छायाचित्राद्वारे पाठविलेल्या ३८,५८८ खड्डय़ांची ‘पॉटहोल ट्रेकिंग सिस्टिम’वर नोंद झाली. यापैकी ३७,५८८ खड्डे बुजविण्याचे नियोजन अभियंत्यांनी केले आणि कंत्राटदारांनीही त्यातील ३७,४३३ खड्डे बुजविले. (अशी कागदोपत्री नोंद आहे.) सुमारे १,१५५ खड्डे अभियंते आणि कंत्राटदारांनी वाऱ्यावर सोडले.
पावसाळा ओसरताच अभियंते पुन्हा कार्यालयात परतले आणि ‘खड्डे शोध मोहीम’ दरवर्षीप्रमाणेच थंडावली. मात्र ऑक्टोबरनंतरही नागरिक खड्डय़ांची छायाचित्रे पाठवतच होते. जूनपासून आजपर्यंत पालिका दफ्तरी सुमारे ३९,२९२ खड्डय़ांची नोंद झाली. त्यापैकी ३८,२७१ खड्डे बुजविण्याचे नियोजन करण्यात आले. कंत्राटदारांवर ३८,१४६ खड्डे बुजविण्याची कामगिरी सोपविण्यात आली आणि त्यापैकी ३८,०९२ खड्डे बुजविण्यात आले. पालिकेच्या दफ्तरी नोंद झालेले सुमारे १२०० खड्डे आजही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे.
असे सगळे असूनही पालिकेच्या लेखी मात्र आज मुंबईच्या रस्त्यांवर केवळ ५४ खड्डे आहेत. गिरगाव, ग्रॅन्ट रोड, भायखळा, वरळी, परळ, दादर भाग वगळता उर्वरित मुंबईत कुठेच खड्डे नसल्याचे पालिकेच्या संकेतस्थळावरील ‘पॉटहोल ट्रेकिंग सिस्टिम’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. उपनगरांमध्ये तर सगळेच रस्ते अगदी गुळगुळीत आहेत, एकही खड्डा तुम्हाला सापडणार नाही. आणि सापडलाच तर स्वाभाविकच महापालिका त्याला जबाबदार असणार नाही, याची नोंद सुज्ञ नागरिकांनी घ्यावी.