दीड महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने जुलैच्या तिसऱ्या आठवडय़ात हजेरी लावली आणि शहरातील रस्त्यांचे अंतरंग उघडे पडले. अलीकडेच महापालिकेने शहरातील काही चकचकीत रस्त्यांची माहिती दिली होती. परंतु, रिमझिम पावसात विविध भागातील डांबरी रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले असून त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. त्यास जबाबदार कोण, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. रिमझिम पावसात ही स्थिती निर्माण झाली असून जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यास काय होईल, याची धास्ती वाहनधारकांना आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकांमध्ये खड्डे तयार झाल्यामुळे प्रवाशांना कसरत करावी लागत आहे.
शहर परिसरात अवघ्या दोन आठवडय़ांत ठरावीक काळात पावसाने टप्प्याटप्पाने हजेरी लावली. महापालिकेने नेहमी निर्माण होणारे संकट लक्षात घेऊन मान्सूनपूर्व कामांच्या नावाखाली अनेक रस्त्यांवरील खड्डय़ांची तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी केली होती. काही ठिकाणी डांबरीकरणाचा घाटही घातला. मात्र पावसाच्या हलक्या सरींनी त्या कामाचे पितळ उघडे पाडले आहे. उन्हाळ्यात शहरातील अनेक रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले होते. खोदकाम झाल्यावर त्याचे डांबरीकरण करण्याची तसदी घेतली गेली नाही. परिणामी, अनेक रस्त्यांवरील एका बाजूचा भाग रिमझिम पावसाने चिखलमय झाला आहे. या ठिकाणी दुचाकी घसरण्याचे प्रकार घडत आहे. शहर परिसरातील द्वारका, गंगापूर रोड, सिडको, अंबड औद्योगिक समूह, मुंबई-आग्रा महामार्ग, पंचवटी परिसरातील अनेक रस्त्यांवर पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. द्वारका परिसरात उड्डाणपूल आणि काही विकास कामांमुळे खड्डे खोदण्यात आले. काही ठिकाणी ते बुजविले तर काही ठिकाणी तसेच ठेवले गेले.
गंगापूर रस्त्यावरील पंपिंग स्टेशन येथे मुख्य रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. त्यांची खोली इतकी आहे की, रात्रीच्या वेळी वाहनधारकांना लक्षात येत नाही. येथून मार्गक्रमण करताना काही वाहनधारक पडले. याच रस्त्याच्या समोरील बाजूस खोदकाम करून माती टाकली गेली आहे. पावसाने हा पट्टा चिखलमय झाला असून तेथील माती रस्त्यावरही आली आहे. म्हणजे एका बाजूला खड्डे तर दुसऱ्या बाजूला चिखलमय रस्ता असल्याने दोन्ही बाजूकडून मार्गक्रमण करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.
काही रस्त्यांची पहिल्याच पावसात चाळणी झाली. सिडकोत तर वेगळाच प्रश्न आहे. काही नगरसेवकांनी आपल्या प्रभागात रस्त्याच्या कडेला ‘पेव्हर ब्लॉक्स’ बसवून पाणी साचणार नाही, खड्डा होणार नाही याची काळजी घेतली. तर काही नगरसेवकांनी भुयारी गटारीसाठी ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवले. त्या खड्डय़ातील माती पावसाच्या पाण्यामुळे बाहेर येऊन रस्ते निसरडे झाले. पाथर्डी फाटा परिसरात अद्याप काही ठिकाणी डांबरीकरण नाही, पावसाने या रस्त्यावरील खडी वाहून गेली. त्यामुळे मातीच्या रस्त्यावरून जीव मुठीत धरून वाहनधारकांना मार्गक्रमण करावे लागते. रस्त्यांची ही अवस्था अपघातास कारक ठरल्याची वाहनधारकांची तक्रार आहे. मागील काही वर्षांत पावसाळ्यात खड्डय़ामुळे अपघात होऊन काही वाहनधारकांना प्राण गमवावे लागले. यंदा तसा काही प्रकार घडतो की काय, अशी साशंकता व्यक्त होत आहे.शहरातील रस्त्यांप्रमाणे पंचवटी परिसरातील निमाणी बस स्थानकाची अवस्था झाली आहे. या ठिकाणी खड्डय़ांमुळे छोटी छोटी तळे निर्माण झाली आहेत. ठक्कर बाजार बस स्थानकात त्यापेक्षा बिकट स्थिती आहे. संततधारेमुळे डबक्यात पाणी साचून राहते. त्यामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना खड्डय़ांच्या खोलीचा नेमका अंदाज येत नाही. यामुळे बऱ्याचदा अपघात संभावतो. खड्डेमय रस्त्यावरून वाहने चालविल्याने अनेकांची जुनी दुखणी डोके वर काढत आहे.