दक्षिण मुंबईच्या अनेक भागांत गेल्या आठवडय़ात झालेल्या खंडित वीजपुरवठय़ाचे पडसाद गुरुवारी झालेल्या ‘बेस्ट’ समितीच्या बैठकीत उमटले. ‘बेस्ट’ समिती सदस्यांनी बैठकीत या विषयाला वाचा फोडली. अखेर यापुढे असा प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
गेल्या शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर दक्षिण मुंबईत अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. तीन ते चार दिवस वीज नसल्याने पिण्याचे पाणी मिळण्याची समस्याही उद्भवली होती. याबाबत बेस्टच्या विद्युतपुरवठा विभागाकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. या सर्व प्रकाराची दखल घेत रवी राजा यांनी सभा तहकुबीचा प्रस्ताव मांडला आणि याची चौकशी करून अहवाल सादर करण्याची मागणी केली.
या वेळी शिवजी सिंह, केदार होंबाळकर यांनीही वीजपुरवठा विभागावर ताशेरे ओढले. तर सुहास सामंत, सुनील गणाचार्य या सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी तहकुबी प्रस्तावाला विरोध करताना मुंबईकरांचे हाल झाल्याचे मान्य केले. या प्रश्नावर ‘बेस्ट’अध्यक्षांसह पालिका अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात येईल असे स्थायी समितीचे अध्यक्ष व बेस्ट समिती सदस्य यशोधर फणसे यांनी सांगितले.
बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी बेस्ट यंत्रणेने आपत्कालीन परिस्थितीचे योग्य नियोजन केले होते, असे सांगून पाऊस व कोलमडलेल्या वाहतुकीमुळे कर्मचारी कार्यालयात पोहचू शकले नाहीत. त्यामुळे तक्रार निवारणात अडचणी आल्या. शक्य तेथे तातडीने उपाययोजना करण्यात आली, असे सांगितले.