हा रंग ठीक आहे का?..नाही नाही, शेड बदलली आहे त्याची. अरे, ती रेष घे ना व्यवस्थित.. असे संवाद ऐकू येत आहेत. मध्येच कुणीतरी एखाद्या स्टुलावर चढून नेमका हव्या त्या ठिकाणी चित्र रंगवण्याचा प्रयत्न करतोय तर तिकडे दुसराच कुणीतरी चित्र व्यवस्थित होतय ना, याची काळजी करतोय. ही सगळी वर्णने आहेत शासकीय चित्रकला महाविद्यालयातील, जेथे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाची भिंतच रंगवायला काढलीय.. हो अख्खी भिंतच. कलेच्या विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळावा म्हणून महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना या उपक्रमासाठी प्रोत्साहित केले आहे.
चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थी पुस्तकातून चित्रकलेची विविध अंगे शिकतातच. मात्र, शिकलेल्या या गोष्टी प्रत्यक्षात करण्याची संधी या उपक्रमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे. कोणत्याही कलाकाराचे खरे शिक्षण चार भिंतीच्या बाहेरील जगाच्या शाळेत होत असते.
अभ्यासक्रमाच्या पलीकडे प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांना शिकता यावे म्हणून विद्यार्थ्यांना महाविद्यायालयाची संपूर्ण भिंतच सुंदर रंगांनी रंगवण्याची कामगिरी महाविद्यालयाने सोपविली आहे. बिंदूतून सौंदर्य शोधणारे रझा, सर्वानाच माहीत असलेले चित्रकार एम.एफ. हुसेन, अमृता शेरगिल तसेच इतर नामवंतांची पोर्ट्रेटस् व त्यांनी विकसित केलेल्या शैलीवर आधारित चित्रे या भिंतीवर रेखाटण्यात आली आहेत. बिंदूवर आधारित चित्रे, हुसेनच्या चित्रात हमखास आढळणारा घोडा, इजिप्तमधील चित्रशैलीतील रेखाटने या सर्वाचा उपयोग करून अत्यंत नजाकतीने ही भिंत रंगवली जात आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे संपूर्ण काम केवळ विद्यार्थी स्वत: करीत आहेत. प्राध्यापकांच्या मार्गदर्शनात भिंत सुशोभित करण्याची ही संकल्पना विद्यार्थी आपल्या कुंचल्यातून साकारत आहेत. कॅनव्हासच्या पलीकडे जाऊन मोठय़ा स्केलची चित्रकला करण्याचा, त्या अनुषंगाने रंगांची निवड करण्याचा आणि प्रत्यक्ष चित्र साकारत असताना कलावंत म्हणून त्याचा साक्षीदार होण्याचा अनुभव हे तरुण कलावंत घेत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून या म्युरलवर कष्ट घेणे सुरू असून एक-दोन दिवसात ही कलाकृती पूर्णत्वास येणार असल्याचे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल क्षीरसागर यांनी सांगितले.

रेषांच्या सौंदर्याचा अमूर्त आविष्कार
चित्राला प्रत्येक वेळी कुठला तरी आकार असलाच पाहिजे असे नाही. एखादा बिंदू, एखादी रेष किंवा कुंचल्याचा एखादा फटकाराही सौंदर्य मूर्त रूपात उभे करू शकतो. केवळ रेषांच्या माध्यमातूनही चित्रांचा आनंददायी अनुभव रसिकांना देता येतो, हे सिद्ध करणारे चित्रप्रदर्शन ‘सिंफनी ऑफ लाईन्स’ शासकीय चित्रकला महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. प्रा. संजय जठार यांनी रेखाटलेली ही चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. अमूर्त कलाप्रकाराशी जवळीक साधणारी ही चित्रे रंग व रेषांच्या माध्यमातून अवतीभवतीच्या जगाचा तरल अनुभव करून देतात. प्रदर्शनाचे उद्घाटन १६ डिसेंबरला महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. २४ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनातून रेषांची जाडी, लय, प्रकार व धुसरता यांबद्दल रसिकांना व विद्यार्थ्यांना शिकायला मिळणार आहे. सोनेरी व रुपेरी रंगांचा कलात्मक वापरामुळे ही चित्रे एक वेगळा अनुभव देऊन जातात. कॅनव्हासवर अ‍ॅक्रिलिक रंगांच्या साहाय्याने प्रा. जठार यांनी ही चित्रे रेखाटली आहेत. त्यांची यापूर्वी मुंबई, दिल्ली, चेन्नई येथे देखील चित्रप्रदर्शने झाली आहेत.