नाशिकचे तापमान ४० अंशांच्या उंबरठय़ावर असून टळटळीत उन्हात लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना उमेदवारांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होत असताना रणधुमाळीच्या अखेरच्या टप्प्यात हा जोर कायम ठेवण्याचे प्रत्येकासमोर आव्हान आहे. मतदारसंघातील काना-कोपरा पिंजून काढण्यात मग्न झालेले राजकीय पक्ष अंतिम टप्प्यात मतदारराजापर्यंत पोहचण्यासाठी जाहीर सभा, प्रचार फेऱ्या, नेत्यांच्या सभा यांचा धडाका सुरू करीत आहे. शिवाय, चित्रपट तारकांच्या सोबतीने ‘रोड शो’सारख्या संकल्पना प्रत्यक्षात आणल्या जात आहेत. जवळपास सर्वच प्रमुख राजकीय पक्षांची एक फळी उपरोक्त उपक्रमांच्या नियोजनात गुंतली असताना दुसऱ्या फळीने कार्यकर्त्यांच्या मदतीने प्रभागवार प्रचार मोहीम तीव्र केली आहे.
नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात २४ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दोन दिवस आधी प्रचाराच्या तोफा थंडावतात. याचा विचार केल्यास या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांना प्रचारासाठी आता केवळ पाच दिवसांचा अवधी शिल्लक आहे. प्रचारात प्रारंभी जोरदार आघाडी घेणाऱ्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांना शेवटपर्यंत तो जोर कायम ठेवणे महत्त्वाचे असते. या प्रक्रियेत वाढते तापमान हे सर्वासमोर मुख्य आव्हान ठरले. निवडणुकीतील यशापयश हे सर्वस्वी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातील रणनीतीवर आधारलेले असते. राज्यातील काही भागातील मतदान प्रक्रिया पार पडल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांचा मोर्चा आता नाशिकसह उत्तर महाराष्ट्राकडे वळला आहे. कमीत कमी काळात अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जाहीर सभा हा उपयुक्त पर्याय मानला जातो. तसेच या माध्यमातून शक्तिप्रदर्शनाद्वारे वातावरणनिर्मितीही करता येते. त्या अनुषंगाने नाशिक लोकसभा मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांनी जाहीर सभांचे आयोजन केले आहे. इतकेच नव्हे तर, चंदेरी दुनियेतील काही वलयांकित व्यक्तींना या प्रचारासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने अंतिम चरणात जाहीर सभा, विधानसभा मतदारसंघनिहाय ठिकठिकाणी प्रचारफेऱ्या, घरोघरी प्रत्यक्ष भेटीगाठी तसेच प्रत्येक समाजाच्या वरिष्ठांसमवेत चर्चा यानुसार प्रचारावर लक्ष केंद्रित केले आहे. गुरुवारपासून सलग तीन दिवस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड, महसूलमंत्री नारायण राणे यांच्या सभा नाशिकमध्ये पुढील तीन दिवसांत होणार आहेत. प्रचाराची मुदत संपण्याच्या दिवशी म्हणजे २२ तारखेला आघाडीतर्फे शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या वेळी चंदेरी तसेच सोनेरी दुनियेतील नामांकित अभिनेते सहभागी केले जाणार आहेत.
सुरुवातीला प्रचारापासून काहीशा अलिप्त राहिलेल्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची फळी अखेरच्या चरणात नाशिकला दाखल होत आहे. महायुतीच्या उमेदवाराने कलावंत व युवा नेत्यांच्या साथीने ‘रोड शो’वर भर दिला आहे. ‘होममिनिस्टर फेम’ आदेश बांदेकर यांचा रोड शो हे त्याचे उदाहरण. कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची सभा शुक्रवारी रात्री हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणार आहे. त्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते दिवाकर रावते यांची सभा होणार आहे. जाहीर प्रचाराच्या अखेरच्या दिवशी युवा नेते आदित्य ठाकरे व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. प्रचाराचे हे नियोजन करताना शिवसेनेने याच कालावधीत मतदारांना चिठ्ठी वाटप, ज्यांची नावे नाही ती शोधण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
मनसेने ‘वन मॅन आर्मी’चा पुन्हा कित्ता गिरविला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शनिवारी होणाऱ्या जाहीर सभेवर पक्षाची पूर्ण भिस्त आहे. याशिवाय प्रचार फेऱ्या, पदाधिकारी-कार्यकर्ते- नागरिक यांच्या बैठकांचे सत्र अखेपर्यंत मनसे सुरू ठेवणार आहे. आम आदमी पक्षाने अंजली दमानिया, योगेंद्र यादव यांच्या  रोड शोचे नियोजन केले आहे. ठिकठिकाणी चौकसभा व फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. डाव्या आघाडीने कुठलाही गाजावाजा न करता नरसय्या आडाम आणि त्रिपुरा येथील आदिवासी विकासमंत्री जितेंद्र चौधरी यांची जाहीर सभा आयोजित केली आहे.