जेमतेम दहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्याच झाली आहे आणि त्यासाठी तिचा नवरा आणि दीर दोघेही जबाबदार असल्याचा आरोप मुलीचे वडील चंद्रकांत चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. प्रतिमा सुशील शिंदे (२४) या उच्चविद्याविभूषित मुलीने मुंबईत गळफास लावून १४ डिसेंबरला आत्महत्या केली. प्रतिमाने मास्टर ऑफ कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन (एमसीए) पदवी संपादित केली होती. ती नोकरीही करायची. आश्चर्य म्हणजे आत्महत्येच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईच्या राहुल इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रतिमाची मुलाखत होती.
चंद्रकांत चव्हाण प्रवरानगर येथील विखे पाटील साखर कारखान्यात नोकरीला असून त्यांचे सासरे दिवाकरराव मोहिते नागपुरातील प्रतापनगरात राहतात. प्रतिमाचे दहा महिन्यांपूर्वी मोहिते यांच्या घरूनच नागपुरातील मानेवाडा भागातील सुशील सुधाकर शिंदे (२९) याच्याशी लग्न झाले. सुशील अंधेरीतील एफ् कॉन कंपनीत नोकरीला असून वसई भागात त्याने भाडय़ाने फ्लॅट घेतला होता. आत्महत्येच्या १५ दिवसांपूर्वीच प्रतिमा आणि तिचा दीर सुयोग (२०) लग्नाचे आंधण घेऊन मुंबईला रवाना झाले होते. त्या दोघांसह सुयोगही त्या ठिकाणी १५ दिवस राहिला. १४ डिसेंबरला त्याने रेल्वेचे परतीचे तिकीट काढल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, प्रतिमाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आले असून त्यासाठी जावई सुशीलच जबाबदार असल्याचे चंद्रकांत चव्हाण यांनी सांगितले. प्रतिमाचा मानसिक छळ होत होता आणि तिला तिच्या इच्छेनुसार काहीही करण्याची मुभा नव्हती. आश्चर्य म्हणजे आत्महत्येची खबर सुशीलने त्याच्या मुंबई, पुणे आणि नागपुरातील नातेवाईकांना दिली मात्र, सासूसासऱ्यांना दिली नाही. नालासोपारा पोलिसांकडून मुलीने आत्महत्या केल्याचे चव्हाण कुटुंबीयांना कळले. त्यावेळी चव्हाण कुटुंबीय प्रवरानगरहून अमरावती जिल्ह्य़ातील बडनेऱ्याला नातेवाईकाच्या लहान मुलाला पाहण्यासाठी निघाले होते. बेलापूर रेल्वे स्थानकावर उभे गाडीची वाट पाहत असताना नालासोपारा पोलिसांनी त्यांना प्रतिमाच्या आत्महत्येची माहिती दिली. घटनेच्या दिवशी प्रतिमाच्या पोटात अन्नाचा कणही नसल्याचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी चव्हाण यांना सांगितले.
दरम्यान, सुशीलचे एकूण वर्तनच संशयास्पद असून त्याच्या बोलण्यात विरोधाभास असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. घटनेच्या दिवशी ‘आमचे भांडण झाले नाही. मी भावाला सोडवायला स्टेशनवर गेलो होतो’, असे सुशील म्हणाला तर नंतरच्या बयाणात ‘किराणा आणायला गेल्याचे’ आणि ‘नोकरीसाठी तिला विरोध केल्याने तिने आत्महत्या केल्याचे सुशीलने सांगितल्याचे चव्हाण म्हणाले. परवा १६ डिसेंबरला नागपुरात मानेवाडा घाटावर प्रतिमाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी तिच्या सासरच्या लोकांनी अंत्यसंस्काराच्यावेळी सहकार्य केले नसल्याचे चंद्रकांत चव्हाण यांनी सांगितले. गळफास लावून आत्महत्या केल्याचे सर्वात प्रथम सुशीलने पाहिले तेव्हा आत्महत्येपूर्वी प्रतिमाने लिहून ठेवलेली ‘सुसाईड नोटही’ सुशीलने लांबवल्याचे चव्हाण कुटुंबीयांना वाटते. आश्चर्य म्हणजे सुशील प्रतिमाला घेऊन सौदी अरेबियाला जाणार होता. नंतर ते रद्द झाले. तसेच एकाने नोकरी करून दुसऱ्याने घर चालवायचे हे देखील त्या दोघांनी ठरवले होते. असे असताना सुशीलचा प्रतिमाच्या नोकरीला विरोध होता, असे म्हणणे गैरलागू ठरते. दरम्यान, दोन्ही कुटुंबीयांकडून राखून बोलले जात असल्याचे प्रथमत: दिसते.

नवरा व दीर न्यायालयीन कोठडीत
या प्रकरणी सोमवारी सुशील आणि सुयोग यांना नालासोपारा पोलिसांनी अटक केली होती. त्यात त्यांना गुरुवापर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी दिली होती. आज पुन्हा त्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी वाढविण्याचा आग्रह करण्यात आला मात्र, त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याने त्या दोघांचीही रवानगी ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आल्याचे नालासोपारा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक इरफान नदाफ यांनी सांगितले.