तरुणाईच्या सहभागाने उत्साह येत असलेल्या पनवेलच्या चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा शोभायात्रेत तरुणांचा एकाच तालावर होणाऱ्या ढोलताशांच्या निनाद यावेळी पुन्हा एकदा पनवेलच्या अरुंद गल्ल्यांत घुमणार आहे. गेल्या महिन्याभरापासून ही तरुणमंडळी हायस्कूल पटांगणात व पनवेल औद्योगिक वसाहतीच्या मोकळ्या जागेत यासाठी एकजुटीने सराव करत आहेत.
पनवेलच्या शोभा यात्रेची सुरुवात १९९९ पनवेलमध्ये नगर परिषदेजवळ असणाऱ्या खरेवाडय़ातील सुनीता खरे यांनी खासगी स्वरूपात सुरू केली. त्यानंतर संघ परिवाराची शाखा असणाऱ्या संस्कार भारतीने यामध्ये पुढाकार घेऊन या यात्रेला सर्वसामान्यांची व संपूर्ण पनवेलकरांच्या सांस्कृतिकतेची ओळख देणाऱ्या शोभा यात्रेचे रूप दिले. कालांतरणाने या यात्रेच्या नियोजनासाठी नव वर्ष स्वागत यात्रा समितीची स्थापना करण्यात आली आहे. सध्या ही समिती पनवेलकरांच्या या मानाच्या यात्रेचे नियोजन करीत असते.
दरवर्षी सुमारे ८५ सामाजिक मंडळे, गृहनिर्माण सोसायटय़ा या शोभायात्रेत सहभागी होत असतात. ही यात्रा स्वत: अनुभवावी यासाठी स्वागत समितीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नवीन मार्गाने ही यात्रा काढण्याचा संकल्प कायम ठेवला आहे. यावेळी या यात्रेचे आकर्षण लहान मुलांचे बरची पथक असणार आहे. युवानाद या ढोलपथकाचा ताल धरणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांनी पथकांची उभारणी केली आहे. या पथकात ६० मुलामुलींचा सहभाग आहे. ध्वजपथकासह चलचित्र व सामाजिक संदेश देणारे उपक्रम या यात्रेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जेष्ठ नागरिक संघ तसेच पनवेलमधील सामाजिक संघटनाही या यात्रेत सहभागी होणार आहेत. यात्रेचे स्वागत करण्यासाठी व सोसायटय़ांनाही सहभाग नोंदवण्यासाठी चौकाचौकात रांगोळी काढण्यात येणार आहे. शनिवारची पहाट ही पनवेलच्या रस्त्यांवर विविध रंगांनी भरलेली व कल्पकतेने काढलेली रांगोळी पनवेलच्या संस्कृतीची ओळख सांगणार आहे. ही यात्रा वि. खं. हायस्कूल येथून सुरू होणार आहे. त्यानंतर ती गावदेवीपाडा, लाइनआळी, आदर्श लॉजमार्गे विरुपाक्ष मंदिर, जयभारत नाका त्यानंतर ती टिळक रोडमार्गे जाणार असून सावरकर चौकात यात्रेचा समारोप होईल, अशी माहिती स्वागत समितीचे सचिव अविनाश कोळी यांनी दिली. पनवेलकरांनी शनिवारी सुटी साजरी करण्यासोबत सकाळी पारंपरिक वेशात या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन स्वागत समितीतर्फे करण्यात आले आहे.

जनजागरण रॅली
प्रतिनिधी, उरण
इंटरनेटचा वापर करताना सावधगिरी बाळगावी यासाठी उरणमधील महिला संघटनांतर्फे उरण शहरातून जनजागरण रॅली काढण्यात आली होती. रॅलीची सुरुवात उरण नगरपालिकेच्या साने गुरुजी बालोद्यानातून करण्यात आली. या वेळी गौरी देशपांडे, सीमा घरत यांनी महिलांचे नेतृत्व केले. या रॅलीत उरण तालुक्यातील एन. आय. फुंडे, जेएनपीटी, यूईएस आदी शाळांतील विद्यार्थिनीही सहभागी झाल्या होत्या. फेसबुक, एसएमएस, मोबाइल वापरताना घ्यावयाच्या दक्षतांचे पत्रक सामाजिक कार्यकर्ते प्रसाद मांडलकर यांनी वितरित केले.
उरणसारख्या विकसित होणाऱ्या शहरात सायबर गुन्ह्य़ाची नोंद करण्याची सोय नाही. त्यामुळे उरणमध्ये असा गुन्हा घडल्यास नवी मुंबई गाठावे लागते. त्यामुळे उरण शहरात सायबर गुन्ह्य़ाची नोंद करण्याची सोय करण्याची मागणी या रॅलीच्या वेळी पोलिसांना दिलेल्या निवेदनात महिला संघटनांनी केली आहे. समाजात अशा प्रकारे जनजागरण करण्याची नितांत गरज असल्याचे मत उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी व्यक्त केले आहे.