परीक्षकांवर वक्तृत्वाची छाप पाडण्यासाठी होणारे हरतऱ्हेचे प्रयत्न..विषयांची मुद्देसूद मांडणी करताना अलीकडील उदाहरणांची गुंफण..शब्दागणिक व्यक्त होणारा आत्मविश्वास आणि मुख्य म्हणजे प्रतिस्पर्धी स्पर्धकाच्या वक्तृत्वासही देण्यात येणारा प्रतिसाद..
‘लोकसत्ता’च्या वतीने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतंर्गत येथे आयोजित नाशिक विभागीय केंद्राच्या प्राथमिक फेरीची ही काही वैशिष्टय़े. नाथे प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाईस, भारतीय आयुर्विमा यांच्या सहकार्याने आयोजित स्पर्धेला जनकल्याण सहकारी बँक लि.ची मदत झाली आहे. येथील गंगापूर रस्त्यावरील कुसुमाग्रज स्मारकात रंगलेल्या प्राथमिक फेरीत मालेगाव, कळवण, चांदोरी, सिन्नर, सटाणा, देवळा आदी ठिकाणांहून १७ महाविद्यालयातील ३१ तर, शहर परिसरातील १८ महाविद्यालयांमधील ३१ याप्रमाणे जिल्ह्यातून एकूण ६२ स्पर्धकांनी आपल्या वक्तृत्वाचे कौशल्य परीक्षकांसमोर सादर केले. स्पर्धेसाठी सामाजिक चळवळींचा राजकीय परिणाम, अतिसंपर्काने काय साध्य?, जगण्याचे मनोरंजनीकरण, आपल्याला नायक का लागतात? आणि जागतिकीकरणात देश संकल्पना किती सुसंगत, या विषयांवर स्पर्धकांनी मते मांडली. बहुतांश स्पर्धकांनी आपल्याला नायक का लागतात? या विषयावर मते मांडली. नायक ही संकल्पना पूर्वापार  सुरू आहे. प्रत्येक व्यक्तीत नायक व खलनायक अशी दोन रूपे असतात ती परिस्थितीनुरूप बदलतात. काळ कितीही बदलला तरी समाजाला चेहरा असलेल्या ‘नायक’ची गरज कायम आहे. जो आपले प्रतिनिधीत्व करेल, आपल्या देशाला वा समाजाला एकसंध ठेवेल, दुर्लक्षित घटकाला न्याय देईल, आपल्याला योग्य दिशा देईल, जो समाजाचे काय चुकले हे सांगतांना प्रत्यक्ष कृतीवर भर देईल असा नायक आपल्याला गरजेचा आहे. यातही समाजाची मानसिकता ही पुरूषच नायक असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. अतिसंपर्काने साधले काय, या विषयाच्या बाजूने प्रतिकूल आणि अनुकूल अशी मतांची एकूण गोळाबेरीज पाहावयास मिळाली.
अतिसंपर्काने लोको तांत्रिकदृष्टय़ा एकमेकांजवळ आली असली तरी भावनिकदृष्टय़ा दुरावली. आपल्या भावना हसऱ्या, रडय़ा चेहऱ्यांमध्ये बंदिस्त होऊन गेल्या. सामाजिक जाणिवा जागृत झाल्या तशा त्या बोथटही झाल्या. आजूबाजुचे वातावरण बदलत गेले. यामुळे आता प्रश्न पडतो या अतिसंपर्काने नेमके साधले काय? तर ‘फेसबुक वर फार मित्र पण गल्लीत विचारत नाही कुत्रं’ अशी अवस्था माणसांची झाली असल्याचा मार्मिक टोला एका स्पर्धकाने हाणला. महिलांवरील वाढते अत्याचार, एकमेकांवर मालकी हक्क गाजविण्याची अहमहमिका, तुटक संवाद अशी काही उत्तरे या माध्यमातून शोधण्यात आली. सामाजिक चळवळींचा राजकीय परिणामाचा विचार हा विषय मांडताना स्वातंत्र्यपूर्व ते स्वातंत्र्योत्तर काळात झालेली वेगवेगळी आंदोलने त्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या चळवळी, त्याला लाभलेले नेतृत्व, यांचा विचार करत असतांना राजकीय परिणामांचे विविध पैलू स्पर्धकांनी मांडले.
जगण्याचे मनोरंजनीकरण हा विषय अगदीच मोजक्या स्पर्धकांनी मांडला. मनोरंजन दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मात्र मनोरंजनासोबत प्रबोधन गरजेचे आहे. मनोरंजन विशिष्ट गटाची मक्तेदारी नसून ती सर्व घटकांपर्यत पोहचणे गरजेचे आहे. यासाठी विविध माध्यमे उपलब्ध आहे. मात्र खरे मनोरंजन म्हणजे जगण्यातील आनंद ज्या माध्यमातून मिळतो ते खरे मनोरंजन. मग ती एखादी कला, नवनिर्मिती वा संवादही असू शकतो, असे मत स्पर्धकांनी मांडले.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. अनंत येवलेकर, प्रा. देविदास गिरी, प्रा. भास्कर ढोके आणि वैशाली शेंडे यांनी काम पाहिले. यावेळी परीक्षकांनी वक्तृत्व म्हणजे काय, वक्त्याची शैली कशी असावी, त्याची देहबोली कशी असावी,  विषय हाताळण्याची स्पर्धकाची पध्दत, एखाद्या विषयाला असणारे विविध पैलूं याविषयी माहिती देत असतांना स्पर्धकांमधील गुणदोषांवर चर्चा केली.