वेगवेगळ्या कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या नाशिकरोड कारागृहातून गुरुवारी एक कैदी पळून गेल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षभरापूर्वी कारागृहाच्या संरक्षण भिंतीला टॉवेल व कपडय़ांच्या दोरीने ओलांडत एक कैदी पसार झाला होता.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह सातत्याने चर्चेत असते. कैद्यांकडे सापडणारे भ्रमणध्वनी, कारागृहातून मुंबईतील बिल्डरला दिलेल्या धमक्या, असे अनेक प्रकार याआधी घडलेले आहेत. गुरुवारी त्यात पुन्हा नव्याने भर पडली. चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असणारा महंमद इस्माईल इद्रीस पसार झाला. त्याला कारागृहातील शेतीच्या कामासाठी पाठवले होते. या कामासाठी कैद्यांना सकाळी लवकर नेले जाते. दुपारी त्यांना कामावरून परत आणण्यात येते. शेतीच्या कामावरून परतलेल्या कैद्यांच्या शिरगणती वेळी हा प्रकार कारागृह प्रशासनाच्या लक्षात आला. त्यानंतर परिसरात शोधाशोध करण्यात आली. परंतु इद्रीस पळून जाण्यात यशस्वी झाला. दरम्यान, वर्षभरापूर्वी कारागृहात या प्रकारची घटना घडली होती. त्यावेळी कैद्याने टॉवेल व इतर कपडय़ांच्या सहाय्याने दोरी तयार केली. कारागृहाच्या संरक्षक भिंतीवरून उडी टाकून तो पळून गेला. पुन्हा एकदा तसाच प्रकार घडल्याने कारागृहाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.