विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मुंबईतील अनेक विकास प्रकल्पांच्या उद्घाटनाचा बार उडवून देणाऱ्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना नवी मुंबईतील सिडकोच्या एक्झिबिशन सेंटरच्या उद्घाटनासाठी वेळ नाही. सिडकोने मागील एका महिन्यापासून मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र पाठवून या सेंटरच्या उद्घाटनाची वेळ मागितली आहे. राज्यातील हे पहिले अद्ययावत आणि आधुनिक असे एक्झिबिशन सेंटर असून त्यात बिझनेस सेंटरचाही सहभाग करण्यात आला आहे. सिडकोने या प्रकल्पावर सुमारे ४५० कोटी रुपये खर्च केलेले आहेत. सायन-पनवेल महामार्ग आणि वाशी रेल्वे स्थानकामधील साडेसात हेक्टर (१८ एकर) जागेवर सिडकोने हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक्झिबिशन सेंटर उभारले असून त्याचे काम पूर्ण झाले आहे. गेले दोन महिने हे सेंटर लोकार्पणाची वाट पाहत आहे. बडय़ा कंपन्यांच्या उत्पादनांसाठी हे सेंटर महत्त्वपूर्ण ठरणार असून यामुळे नवी मुंबईतील हॉटेल व्यवसायाला चालना मिळणार आहे. विविध उत्पादनांचे प्रदर्शन करण्यासाठी या ठिकाणी २२ हजार चौरसमीटर क्षेत्रफळाचे सर्व सुविधायुक्त असे सभागृह बांधण्यात आले असून याच इमारतीत साडेसात हजार क्षेत्रफळाचे बिझनेस सेंटरही उभारण्यात आले आहे. हे सेंटर रस्त्याच्या दोन बाजूला बांधण्यात आल्याने त्या ठिकाणी बिझनेस सेंटर दोन भागांत विभागले आहे. ७५० उद्योजकांसाठी सभागृह, फूट कोर्ट, बैठक सभागृह, लायब्ररी अशा सर्व सुविधा या प्रदर्शन केंद्रात असून त्याची रचना पर्यावरणदृष्टय़ा सोयीची करण्यात आली आहे. या सेंटरच्या उद्घाटनासाठी सिडकोने एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र पाठवून वेळ मागितली आहे. तरी ती अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे एक चांगला प्रकल्प लोकार्पणापासून रखडला आहे. अतिउत्साही सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी तर मागील महिन्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवशी या सेंटरचे उदघाटन होणार, असे जाहीर करून टाकले होते; पण त्यांच्या मनसुभ्यावर पाणी फिरवले गेले. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागेल या चिंतेने आघाडी सरकारने तसेच पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसने उद्घाटनांचा बार उडवून देण्यास सुरुवात केली आहे. या पाश्र्वभूमीवर या सेंटरच्या उद्घाटनाला मुहूर्त का मिळत नाही याची चर्चा सुरू झाली आहे.