दिवाळीकरिता मूळ गावी, माहेरी आणि नातेवाईकांकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने रेल्वे, बस आणि विमान प्रवाशांची गर्दी वाढली असून, खासगी विमान, बस संचालकांनी ही संधी साधून भाडे तीनपट वाढवले आहे.
दिवाळीची प्रवाशांची गर्दी बघता रेल्वे आणि एसटी महामंडळाने विशेष सोय केली आहे. रेल्वेने पुणे आणि मुंबईकरिता विशेष गाडय़ा सुरू केल्या आहेत. एसटी महामंडळाने पुण्याकरिता शिवनेरी बस सुरू केली आहे. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी बाहेर असलेली मंडळी दिवाळीच्या सुटय़ांमध्ये गावाकडे जात असतात. तसेच भाऊबिजेला बहीण किंवा भाऊ एक दुसऱ्याकडे जात असतात. त्यामुळे रेल्वेला प्रचंड गर्दी होते. अनेक दिवसांपासून आरक्षण फुल्ल झाले असते. त्यामुळे तातडीने जाता यावे म्हणून विमानाचा प्रवास करणारेही आहे. तर काही बस प्रवास करण्याचा मार्ग स्वीकारतात. दिवाळीतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन खासगी विमान, बसचे भाडे वाढवण्यात आले असून प्रवाशांची लूट केली जात आहे.
विमानाचे भाडे दुप्पट करण्यात आले आहे. ऐरवी नागपूर ते पुण्याकरिता अडीच ते तीन हजार रुपये भाडे आकारले जाते. आता सहा ते सात हजार रुपये आकारण्यात येत आहे. अशाप्रकारे, मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरूचे भाडे वाढवण्यात आले आहे. विमान प्रवास भाडे उड्डाणाची वेळ, दिवस यानुसार बदलते. दिवाळीच्या दिवसात कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळेला गेले तरी शंभर ते दोनशे रुपयांचा फार तर फरक दिसून येतो.
दिवाळीत खासगी बसचे भाडे तीनपट वाढवण्यात आले आहेत. पुण्याहून नागपूरला येण्याकरिता वातानुकूलित बसचे भाडे ३ हजार रुपये आहे. वातानुकूलित नसलेल्या बसचे भाडे अडीच हजार रुपये आहे. ऐरवी वातानुकूलित बसचे भाडे आठशे ते नऊशे रुपये आणि बिगर वातानुकूलित बसचे भाडे सहा ते सातशे रुपये आकारण्यात येते. एसटी महामंडळाने पुण्याकरिता शिवनेरी आणि निमआराम बस सेवा सुरू केली आहे. शिवनेरीचे पुण्याचे भाडे दोन हजार रुपये आहे तर निमआराम बसचे १ हजार ७३ रुपये आहे.
रेल्वेने प्रवास करण्याची संख्या अधिक असून, रेल्वेने दिवाळीसाठी विशेष गाडय़ांची सोय केली आहे. शिवाय काही मार्गावर प्रिमियम ट्रेन सोडण्यात येत आहे. प्रिमियम ट्रेनचे भाडे इतर ट्रेनपेक्षा अधिक आहे. शिवाय तिकीट विक्रीनुसार भाडे वाढत जाते. त्यामुळे या गाडीचे भाडे दुप्पट ते तिप्पट पडते.