मुंबईलगत असल्याने अतिशय झपाटय़ाने होणाऱ्या नागरीकरणामुळे ठाणे जिल्ह्य़ाचा भूगोल मोठय़ा प्रमाणात बदलत असला तरी या प्रदेशात दोन हजार वर्षांहून अधिक काळातील संस्कृतीचे अवशेष आढळून येत आहेत. सध्या इतस्तत: विखुरलेल्या अवस्थेत असलेल्या ऐतिहासिक खुणा जतन करण्यासाठी सुसज्ज वस्तुसंग्रहालयाची आवश्यकता लक्षात घेऊन कल्याण तालुक्यातील रायता येथील अश्वमेध प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. संस्थेचे अविनाश हरड यांनी मुरबाड तालुक्यातील मासले-बेलपाडा येथील वडिलोपार्जित जागेपैकी एक भूखंड वस्तुसंग्रहालयाच्या बांधकामासाठी उपलब्ध करून दिला आहे. शासकीय स्तरावर ठाणे-पालघरमध्ये वस्तुसंग्रहालय उभारण्याबाबत उदासीनता असताना ‘अश्वमेध’ने मात्र खासगी तत्त्वावर छोटय़ा प्रमाणात का होईना ऐतिहासिक दस्तऐवज जतन करण्यासाठी पाऊल उचलले आहे.
रायता येथील तरुण अश्वमेध प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने विविध प्रकारची सामाजिक कामे करतात. गावातील अविनाश हरड यांचे घर हेच संस्थेचे कार्यालय. २००५ च्या पुरानंतर संस्थेचे काम खऱ्या अर्थाने सुरू झाले. गावातील उल्हास नदीकिनारी गणेशोत्सवात विसर्जन करताना अनेकजण बुडून मृत्युमुखी पडत होते. त्यामुळे अश्वमेधच्या सभासदांनी उत्स्फूर्तपणे दरवर्षी विसर्जन घाटांवर स्वयंसेवक म्हणून लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. तेव्हापासून येथे एकही दुर्घटना घडलेली नाही. नियमित रक्तदान शिबिरे भरविणे, बचत गटांना मार्गदर्शन करणे आदी उपक्रमही संस्थेच्या वतीने राबविले जातात. मुरबाड आणि कल्याण तालुक्यात फिरताना आढळणाऱ्या जैव विविधतेचे जतनही अश्वमेधच्या स्वयंसेवकांनी केले आहे. परिसरातील आढळून येणाऱ्या पक्ष्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन शाळांमध्ये भरविले जाते.
ग्रंथ, शिल्प, नाणी आणि शस्त्रे
अविनाश हरड यांना ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाड तालुक्यातील ऐतिहासिक दस्तऐवजांचे सर्वेक्षण करण्यासाठी मुंबईतील एशियाटिक सोसायटीने शिष्यवृत्ती दिली आहे. त्यासाठी केल्या जाणाऱ्या भटकंतीत त्यांना या भागात अनेक प्राचीन शिल्पशिळा आढळल्या आहेत. त्यात सातवाहनकालीन जातेसुद्धा आहे. सध्या त्यांच्या निवासस्थानीच हा दस्तऐवज आहे. मुकुंद टुमकर आदींकडून प्रतिष्ठानला ऐतिहासिक शस्त्रे, प्राचीन नाणी मिळाली आहेत. पक्षीतज्ज्ञ विभास आमोणकर यांच्याकडून अविनाश हरड यांनी पक्षी निरीक्षणाचे धडे घेतले. त्यांनी त्यांचा ग्रंथसंग्रहसुद्धा अश्वमेध प्रतिष्ठानला दिला आहे. इतर अनेकांनीही दुर्मीळ अशी ग्रंथसंपदा संस्थेला दिली. त्यात काही हस्तलिखित पोथ्याही आहेत. त्यातून संस्थेचे सुसज्ज ग्रंथालय साकारले आहे. गाव परिसरातील वाचक त्याचा लाभ घेतातच, शिवाय पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांनाही त्याचा खूप उपयोग होत आहे. वस्तुसंग्रहालयासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे माजी संचालक डॉ. सदाशिव गोरक्षकर, काका हरदास आदींचे मार्गदर्शन संस्थेला मिळत आहे.