लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दारुण पराभवानंतर दोन्ही पक्षातील नेते आणि कार्यकर्ते एकत्रित येऊन पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतील, अशी अपेक्षा असताना आता विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना शहर आणि जिल्ह्य़ातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांंमधील अंतर्गत हेवेदावे चव्हाटय़ावर येणे सुरू झाले आहे. दुसरीकडे भाजपमध्ये अंतर्गत कलह असले तरी ते समोर न आणता सध्या तरी त्यांनी एकीचे प्रदर्शन घडवून राजकीय मोर्चेबांधणीत आघाडी घेतल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात जिंकण्याचा निर्धार करण्यापेक्षा पुन्हा एकदा गटबाजी समोर आली आहे. काँग्रेसमध्येही विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्यावरून गटबाजी समोर आली आहे.
राष्ट्रवादीचा नुकत्याच झालेल्या निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने शहर अध्यक्ष अजय पाटील यांच्या विरोधात पुन्हा एक गट सक्रिय झाला आहे. अजय पाटील यांचे चिरंजिव शुभंकर पाटीलला त्यांच्या काही विरोधी गटातील कार्यकर्त्यांनी मारहाण करून अजय पाटील यांना एकप्रकारे शह दिल्याचे बोलले जात आहे. वेदप्रकाश आर्य यांच्या सांगण्यावरून मुलाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप पाटील यांनी केलेला असताना आर्य यांनी मात्र माझा त्यात काहीच संबंध नसल्याचे सांगून पाटील यांच्यावर मानहानीचा दावा करणार असल्याचे स्पष्ट केले.  
राज्यातील आघाडी सरकार चालविणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला पक्षांतर्गत भांडणांनी घेरले आहे. ही भांडणे नेमकी बाहेर येऊ लागली असून याची सुरुवात अजय पाटील यांच्याविरोधातील मोठय़ा बंडाने झाली. शहर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत असलेले अजय पाटील यांच्या विरोधातील एक गट अचानक सक्रिय झाल्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली असून ही भांडणे थेट पक्ष पदाधिकाऱ्यांकडे जाणार असल्याचे वेदप्रकाश आर्य यांनी सांगितले. पाटील यांच्या विरोधात यापूर्वी विरोधकांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र, पक्षश्रेष्ठींनी दाद न दिल्याने त्यांचे प्रयत्न थंडावले.
आता पुन्हा त्यांच्या विरोधात काही विरोधक सक्रिय झाले असून त्याची सुरुवात म्हणजे निर्धार मेळाव्यात वसंतराव देशपांडे सभागृहात कार्यकर्त्यांंमध्ये झालेला राडा. निर्णय प्रक्रियेत अजय पाटील राष्ट्रवादीतील सर्व गटांना विश्वास घेत नाहीत, हा त्यांच्या विरोधकांचा मुख्य आक्षेप असून त्यांच्या जागी दुसऱ्या नेत्याची वर्णी लावावी, अशी जोरदार मागणी होऊ लागली असली तरी पाटील यांनी त्या संदर्भात पक्षश्रेष्ठींकडे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्याविरोधात शहरातील काही नेते राजकारण करीत असले तरी त्याला फारसे महत्त्व न देता निवडणुका समोर असल्यामुळे पक्ष वाढविण्यासाठी आणि जनविश्वास संपादनण्यासाठी काम करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारीवरून काँग्रेसमधील हेवेदावे समोर येत आहेत. या निमित्ताने काँग्रेसमधील अनेक गट एकमेकांविरोधात सक्रिय झाले आहेत. जयप्रकाश गुप्ता यांच्यानंतर विकास ठाकरे यांच्याकडे शहर अध्यक्षाची जबाबदारी आल्यावर त्यांनी लोकसभा निवडणुकीत विविध गटातील कार्यकत्यार्ंना संघटीत करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्यावरून विविध गटातील नेते सक्रिय झाल्यामुळे पुन्हा गटबाजी समोर येत असल्याचे दिसते. राज्यात आघाडीचा एकत्र निवडणुकीचा कुठलाच निर्णय झालेला नसला तरी दोन्ही पक्षाचे इच्छुक कार्यकर्ते मात्र सक्रिय झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत कोणी काम केले आणि कोणी नाही, याची उणीदुणी काढली जात असून एकमेकांवर आरोप केले जात आहे. शहर अध्यक्षांनी काही इच्छुकांची यादी पक्षश्रेष्ठींकडे दिली असली तरी त्या यादीला मात्र काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी विरोध केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काँग्रेस-राष्ट्रवादी शहर काँग्रेस अंतर्गत भांडणांच्या फ ेऱ्यात सापडली असताना केंद्रात भाजपाचे सरकार आल्यावर विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी नेते आणि कार्यकर्ते सक्रिय झाले असून त्यांनी बुथपातळीवर बैठका आणि मेळावे घेणे सुरू केले आहे.
भाजपमध्ये काही स्थानिक पदाधिकारी वरिष्ठांचा दाखल घेत उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहेत. भाजपामध्ये वाद, आरोप-प्रत्यारोप होत असले तरी ते समोर येत नसल्याचे दिसते.
पक्षाने राजकीय संघटन बळकटीकडे लक्ष केंद्रित केले आहे. शहर पातळीवर भाजप नेत्यांचे एकाच व्यासपीठावर येणे, गडकरी-फडणवीसांचे सोबत राहणे आणि भाजपचे सर्व आमदार एकत्र दिसणे, ही भाजपची बलस्थाने असल्याने येणाऱ्या काळात भाजपचा नागपूर शहर आणि जिल्ह्य़ातील गड मजबूत करण्यावर गडकरींनी दिशा दिग्दर्शन केल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.