उरणमध्ये मान्सूनपूर्व रस्त्यांचे डांबरीकरण करत यंदा खड्डेमुक्त रस्त्यांची वल्गना प्रशासनाकडून करण्यात आली होती. मात्र पहिल्याच पावसात पुन्हा खड्डे पडल्याने प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या कामांचा दर्जा समोर आला. यातच अद्याप खड्डे भरण्यात न आल्याने बाप्पाच्या आगमनाला त्यांचे विघ्न दरवर्षीप्रमाणे कायम आहे.
शहरात मे महिन्याच्या अखेरीस खड्डे बुजवूनही रस्त्याला खड्डे पडल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जेमतेम अडीच ते तीन किलोमीटरच्या परिघात हे शहर वसलेले आहे. शहराच्या कोटनाका आणि उरण एसटी स्टँड चारफाटा या दोन्ही प्रवेशद्वारांत नेहमीच खड्डे पडलेले असतात. त्याचप्रमाणे पालवी हॉस्पिटल, कामठा रोड, आपला बाजार नाका, खिडकोळी नाका येथे तर खड्डे असतात, त्याचप्रमाणे उरण ते मोरा या रस्त्यात सध्या खड्डा आणि रस्ता याचा शोध घेऊन वाहनचालकांना वाहन चालवावे लागत आहे. मोरा रस्त्यातील खड्डय़ांमध्ये काही दिवसांपूर्वी नागरिकांनी वृक्षारोपणही केलेले होते. खड्डे भरण्यासाठी आवश्यक असलेली खोली, खडी आणि डांबराचे योग्य प्रमाण वापराचा अभाव यामुळे खड्डे पुन्हा पडत असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
याबाबत नगरपालिकेच्या मुख्याधिकारी चारुशीला पंडित यांच्याशी संपर्क साधला असता गणेशोत्सवापूर्वी शहरातील खड्डे बुजविले जातील, असे त्यांनी सांगितले.