मध्य रेल्वेवर गेल्या काही दिवसांत प्रवाशांना कमालीच्या गैरसोयींना तोंड द्यावे लागल्याच्या पाश्र्वभूमीवर पश्चिम रेल्वे ‘सुखाची!’ असा काहिसा गैरसमज होण्याची शक्यता आहे. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की १०-१५ मिनिटांचा विलंब हे पश्चिम रेल्वेवर ‘रूटिनच’ असते. या विलंबाची उत्तरे प्रवाशांना कधीच मिळत नाहीत. फलाटावरील घडय़ाळ्याचे काटे पुढे सरकत जातात. मात्र इंडिकेटरवरची वेळ बराच काळ तशीच राहते.
पश्चिम रेल्वेच्या जलद मार्गावरील गाडय़ा इंडिकेटरवर दाखविलेल्या वेळेपेक्षा नेहमीच विलंबाने असतात. एखादवेळी चुकून गाडी वेळेवर आली तर प्रवाशांची धावपळच उडते. अर्थात असा अनुभव क्वचितच येतो. काही वेळा लागोपाठ गाडय़ा येतात. परिणामी एखाद्या गाडीला तोबा गर्दी होते तर काही गाडय़ा रिकाम्या धावतात. पुढची गाडी विलंबाने येऊ शकेल, अशी भीती वाटल्याने प्रवासीही ताटकळत न राहता जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. याबाबत कुठलीही उद्घोषणा करण्याचा रेल्वेचा प्रघातच नाही. मध्यंतरी रेल्वेवरील डीसी विद्युत प्रवाह एसी विद्युत प्रवाहात रूपांतरीत केल्यामुळे आता प्रवास सुखाच होईल, हा प्रशासनाचा दावाही फोल ठरला आहे. आजही बऱ्याचवेळा अचानक रेल्वेतील विद्युत सेवा खंडित होते. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन अर्थात एमआरव्हीसीतर्फे दोन्ही रेल्वेंवर नव्या, चकचकीत गाडय़ा आल्या. पूर्वीच्या गाडय़ांच्या तुलनेत या गाडय़ा नि:संशय चांगल्या आहेत. मात्र आता या नव्या गाडय़ांमध्ये बहुतांश दिवे आणि बरेच पंखे बंद असतात. साधारणपणे प्रत्येक डब्यात २५ ते ३० टक्के दिवे आणि पंखे बंद असतात. रात्री घरी जाताना शांतपणे एखादे पुस्तक अथवा वृत्तपत्र वाचत जाऊ, अशी इच्छा असणाऱ्यांना सक्तीने ‘झोप’ काढावी लागते.

* पार्ले ते गोरेगाव – छळप्रवास
प. रेल्वेवर पार्ले ते गोरेगाव हा धीम्या मार्गावरील प्रवास म्हणजे अक्षरश: छळछावणी आहे. वास्तविक हा प्रवास जास्तीत जास्त १२ मिनिटांचा आहे. प्रत्यक्षात त्यासाठी २० ते २५ मिनिटे लागतात. चर्चगेटहून पाल्र्यापर्यंत सुमारे ३५ मिनिटांत आलेली बोरिवली धीमी लोकल त्यापुढे एवढी रखडते की ज्याचे नाव ते! अंधेरीला उतरण्यासाठी दरवाज्याजवळ आलेल्यांना अनेकदा १०-१० मिनिटे ताटकळावे लागते. तर त्यापुढे अंधेरी यार्डातून जोगेश्वरीला पोहोचण्यासाठी ती लोकल आणखी ७-८ मिनिटे आणि पुढे गोरेगावपर्यंतची दोन फाटके, नवीन स्थानकाचे काम आणि अन्य काही अनाकलनीय कारणे यांची अडथळ्यांची शर्यत ओलांडून गोरेगावात पोहोचायला तिला आणि ८-१० मिनिटे लागतात. गंमत म्हणजे प. रेल्वेच्या सहनशील प्रवाशांनी हे सगळे इतके अंगवळणी पाडून घेतले आहे की कोणी याबद्दल स्टेशन मास्तरकडे तक्रारही करीत नाही. पाल्र्यापर्यंत अवघी  ४-६ मिनिटे उशीरा धावणारी ही लोकल गोरेगावला सुमारे १५-१७ मिनिटे उशीरा पोहोचते.