भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आयोजित केलेला रंगारंग कार्यक्रम नृत्यकलाकार आणि गायकांनी गाजविला. लोकप्रिय मराठी, हिंदी आणि राष्ट्रभक्तीपर गीतांनी उपस्थित पाच हजार रसिक मंत्रमुग्ध झाले. बीकेसी प्रॉपर्टी ओनर्स असोसिएशन आणि जी ब्लॉक असोसिएशन यांचे सहकार्य लाभले.
 हातात तिरंगा घेऊन २० नृत्यकलाकारांनी वंदे मातरम् साकारत सोहळ्यास सुरुवात केली. त्यानंतर सूरक्षेत्र फेम शेहजाद अलीने श्रवणीय गीते म्हणत श्रोत्यांना आकर्षित केले. इंडियन आयडॉल फेम राहुल वैद्य आणि अमिताभ नारायण यांनीही लोकप्रिय गाणी म्हणत श्रोत्यांना खिळवून ठेवले. इंडियन आयडॉल अभिजित सावंत याने गाण्याने सर्वाचीच मनेजिंकली.
कृष्ण अ‍ॅक्ट आणि दशावतार या प्रिन्स समूहाने सादर केलेल्या कार्यक्रमाने विशेष दाद देण्यात आली. सलमान खानच्या चित्रपटातील ‘जय हो’च्या घोषणाने कार्यक्रमाची दिमाखात सांगता झाली. प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईच्या नव्या उद्योग केंद्रात, वांद्रे कुर्ला संकुलातील सर्वच इमारती आकर्षक रोषणाईने न्हाऊन निघाल्या. विविध शासकीय विभागांनी तयार केलेले कल्पक चित्ररथ उपस्थितांचे आकर्षण ठरले. या वेळी राज्याचे मुख्य सचिव जे. एस. सहारिया, माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव, राजेश अग्रवाल, माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया, महानगर आयुक्त, यू. पी. एस. मदान आणि अतिरिक्त महानगर आयुक्त संजय सेठी उपस्थित होते.