ब्रिटिश काळापासून बंदर भाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवडी, वडाळा, रे रोड आदी भागांपासून ते अगदी अलिकडच्या काळात वसलेल्या नवी मुंबईसारख्या नव्या महानगरीपर्यंत विविध स्तरांवरील प्रवाशांची वाहतूक हार्बर मार्गावरून होते. गेल्या काही वर्षांत या मार्गावरील प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र हार्बर मार्ग आहे तसाच आहे. ‘एमयुटीपी’च्या दुसऱ्या टप्प्यात या मार्गावरील प्रवाशांना दिलासा देण्याच्या दृष्टीने दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना हात घातला आहे. अंधेरी स्थानकाच्या पुढे गोरेगावपर्यंत हार्बर मार्गाचे विस्तारीकरण आणि हार्बर मार्गावरील गाडय़ांच्या डब्यांची संख्या नऊवरून १२ करणे, या दोन प्रकल्पांमुळे या मार्गावरील बरेच प्रश्न सुटतील. मात्र हे दोन्ही प्रकल्प पुढील दोन वर्षे पूर्ण होणार नाहीत..
हार्बर मार्गाचे गोरेगावपर्यंत विस्तारीकरण
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि पश्चिम रेल्वे यांना जोडणारा हार्बर मार्ग पश्चिम उपनगरांत सध्या अंधेरीपर्यंतच जातो. या मार्गावरील वाढती प्रवासीसंख्या आणि या उपनगरांतील वाढती लोकसंख्या यांचा विचार करून एमआरव्हीसीने हार्बर मार्गाचा विस्तार गोरेगावपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीचे काम सुरू होऊनही तीन वर्षे उलटली आहेत. मात्र अद्याप हे काम निम्मेही पूर्ण झालेले नाही. या मार्गासाठी अंधेरी स्थानकाच्या रचनेत मोठे फेरबदल करावे लागत आहेत. सध्याच्या अंधेरी स्थानकातील डाउन धिम्या मार्गासाठीच्या प्लॅटफॉर्मच्या बाजूला दोन मार्गिकांसाठी जागा टाकली जात आहे. या जागेतून हार्बर मार्गावरील दोन मार्गिका अंधेरीच्या पुढे जातील. या जागेच्या वर मोठे तिकीट घर बांधण्यात आले आहे. या मार्गिकांसाठी जागा तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यापुढे अंधेरी-जोगेश्वरी यांदरम्यान पश्चिमेला जागा मोकळी करण्यात आली आहे. मात्र जोगेश्वरी स्थानकाजवळील एका बारचा आणि रेल्वे फाटकाचा अडथळा या मार्गात आहे. तसेच या मार्गिकेसाठी जोगेश्वरी स्थानकाची रचनाही बदलावी लागणार आहे. हार्बर मार्गाच्या गाडय़ा जोगेश्वरी स्थानकात थांबवण्यासाठी दोन वेगळे प्लॅटफॉर्म सध्याच्या जोगेश्वरी स्थानकाच्या दक्षिणेकडे बनवण्यात आले आहेत. हे प्लॅटफॉर्म बांधून तयार असले, तरी ते वापरात नसल्याने त्यांची विल्हेवाट लागली आहे. तसेच जोगेश्वरी-गोरेगाव या दोन स्थानकांमध्ये ओशिवरा हे नवीन स्थानक उभारण्यात आले आहे. नेमक्या याच स्थानकामुळे हार्बर मार्गाचे विस्तारीकरण मोठय़ा प्रमाणात रखडले आहे. या स्थानकातच रेल्वे फाटक आहे. हे रेल्वे फाटक बंद केल्याशिवाय स्थानक सुरू करणे शक्य होणार नाही. ते बंद करण्यासाठी उड्डाणपूल बांधण्याची गरज आहे. रेल्वेने ओशिवरा स्थानकाच्या उत्तरेला आपल्या हद्दीतील उड्डाणपूल बांधला आहे. मात्र तो पूल पूर्व आणि पश्चिम दिशेला उतरवण्याची जबाबदारी पालिकेची असून पालिकेला अद्याप ते करणे जमलेले नाही. त्यामुळे ओशिवरा स्थानकाचे काम प्रलंबित आहे. पर्यायाने गोरेगावपर्यंत हार्बर मार्गाचे विस्तारीकरणही लटकलेल्या अवस्थेत आहे.
हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा
गेल्या काही वर्षांत हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. नवी मुंबई येथे नवनवीन रहिवासी संकुले उभी राहू लागल्याने आणि त्या शहराचाही विस्तार होऊ लागल्याने हार्बर मार्गाच्या प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे. मात्र या मार्गावरील गाडय़ा अद्यापही ९ डब्यांच्याच आहेत. या गाडय़ांच्या डब्यांची संख्या वाढवण्याचा प्रकल्प एमयूटीपीच्या दुसऱ्या टप्प्यात समाविष्ट असून या टप्प्यातील इतर प्रकल्पांप्रमाणेच तोदेखील रखडला आहे. या प्रकल्पाच्या पूर्ततेत रे रोड, वडाळा आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या तीन स्थानकांचा अडथळा आहे. मुंबई सीएसटी येथील प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या उत्तरेला रेल्वेचीच प्रशासकीय इमारत आहे. ती इमारत पाडणे अशक्य असल्याने एमआरव्हीसीसमोर अनेक समस्या उभ्या आहेत. तसेच वडाळा येथे स्थानकाच्या लगतच काही निवासी बांधकामे आहेत. मात्र वडाळा येथील काम प्रगतीपथावर असून तेथे रेल्वेगाडय़ा उभ्या करण्यासाठी एक स्टेबलिंग लाइन बांधण्याचे कामही करावे लागणार आहे. रे रोड येथेही जागेचा अभाव, हे कारण होते. मात्र त्यावरही तोडगा काढत एमआरव्हीसीने हे काम हाती घेतले आहे. या बांधकामाव्यतिरिक्त हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा धावण्यासाठी १५३ नव्या डब्यांची गरज आहे. हार्बर मार्गावर अजूनही डीसी विद्युतप्रवाह आहे. त्यामुळे येथे धावणाऱ्या गाडय़ा डीसी-एसी अशा दोन्ही प्रवाहांवर धावतील, अशा लागणार आहेत. मात्र एमयूटीपी-२ प्रकल्पांतर्गत उपनगरीय सेवेत येणारे ८६४ नवीन डबे अद्यापि आले नसल्याने हा प्रकल्पही रखडला आहे.

नवीन गाडय़ा
एमयूटीपी-२ या प्रकल्पांतर्गत ८६४ नवीन डबे म्हणजेच ७२ नवीन गाडय़ा उपनगरीय प्रवाशांच्या सेवेत दाखल होणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात या ७२ पैकी फक्त दोनच गाडय़ा पश्चिम रेल्वेच्या सेवेत आल्या आहेत. उर्वरित गाडय़ा मार्च २०१६पर्यंत टप्प्याटप्प्याने दाखल होतील, असा अंदाज एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी व्यक्त केला आहे. पण या गाडय़ा अद्यापि सेवेत न आल्याने उपनगरीय प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.

एमयूटीपी-२ प्रकल्प व किंमत
’ डीसी-एसी परिवर्तन, ८६४ नवीन डबे, रेल्वेरूळ ओलांडणाऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठीचे उपाय – ४४३७ कोटी रुपये
’ ठाणे-दिवा (पाचवी-सहावी मार्गिका), सीएसटी-कुर्ला (पाचवी-सहावी मार्गिका), मुंबई सेंट्रल-बोरिवली (सहावी मार्गिका), हार्बर मार्गाचे विस्तारीकरण – १८०७ कोटी रुपये
’ हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा – ७१४ कोटी रुपये