कल्याण डोंबिवली पालिकेतील प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडे यांना पालिकेच्या महासभेने नियमबाह्य़ पद्धतीने साहाय्यक आयुक्तपदाची बढती दिली आहे. संवर्ग बदलून करण्यात आलेली ही नियुक्ती बेकायदेशीर आहे. त्यामुळे हा ठराव तातडीने विखंडित करावा, अन्यथा याप्रकरणी न्यायालयात दाद मागावी लागेल, असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रधान सचिव श्रीकांत सिंग यांना दिले आहे.
बोराडे यांची मूळ नियुक्ती ही मुख्य बाजार निरीक्षक या पदावर आहे. प्रभाग क्षेत्र अधिकारी, साहाय्यक आयुक्तपदाची बढती मिळविण्यासाठी बोराडे हे अधीक्षक पदावर कार्यरत असणे आवश्यक होते.  राखीव अनुशेषाची सात पदे रिक्त असताना केवळ बोराडे यांना एकटय़ालाच साहाय्यक आयुक्तपदावर बढती देऊन मागासवर्गीयांवर अन्याय करण्यात आला आहे, असे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. बोराडे यांच्या गोपनीय अहवालात अनियमितता आहे. शैक्षणिक पात्रतेमधील संशय, सेवा भरतीचे उल्लंघन व अनेक त्रुटी असताना केवळ त्यांची मर्जी राखण्यासाठी महासभेने केलेला २४ जानेवारीचा बढतीचा ठराव रद्द करावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका माधुरी काळे यांनी केली आहे. दरम्यान, कल्याण डोंबिवली पालिकेने २०१० मध्ये सेवाभरती नियम केले आहेत. त्यामध्ये तांत्रिक, अतांत्रिक संवर्ग निश्चित केले आहेत. त्या सेवाभरती नियमानुसारच हा पदोन्नत्तीचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेपुढे ठेवला, असा दावा उपायुक्त गणेश देशमुख यांनी केला. बोराडे या पदासाठी अपात्र आहेत, असे कोणी म्हणत असेल तर त्यांनी तसे कागदोपत्री भक्कम पुरावे द्यावेत, असेही देशमुख म्हणाले.