‘जनतेच्या पैशाचे संरक्षण करा..विकास करा..पैसे नसतील तर आम्हाला सांगा..असे खडे बोल सुनावत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तालुक्यातील कोटमगाव येथे आयोजित बैठकीत जगदंबा देवस्थानमधील चोरी प्रकरणी संबंधितांची खरडपट्टी काढली.
या वेळी विविध पदाधिकाऱ्यांसह ग्रामसेवक संजय पवार, येवल्याच्या माजी नगराध्यक्षा पंकज पारख, काकासाहेब साताळकर उपस्थित होते. मंगळवारी कोटमगाव देवस्थानातून चार लाख ५० हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी झाली. या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी भुजबळ यांनी देवस्थानाला भेट देत तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. देवस्थानमधील पैसा जनतेचा आहे. भाविकांच्या भावना विचारात घेता स्वच्छता, विकास आणि संरक्षण करण्याची जबाबदारी ट्रस्टची आहे. या गोष्टी तुम्ही सांभाळा अन्यथा शासनाला हस्तक्षेप करावा लागेल, असा इशारा देत मंदिर सुरक्षा व्यवस्थेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
मंदिरात दक्षिणा किंवा देणगी स्वरूपात जमा झालेला पैसा हा जनतेचा आहे. पैसा असूनही त्यांचा योग्य विनियोग होत नाही. गाभाऱ्यातील खिडक्या, दरवाजे व्यवस्थीत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रावसाहेब कोटमे यांनी ट्रस्टला भेडसावत असणाऱ्या अडचणींबाबत माहिती दिली. ट्रस्टमध्ये योग्य व्यक्तींना स्थान देण्याची सूचनाही भुजबळ यांनी केली. ट्रस्टचा कारभार करताना मनमानी नको, असे सांगत ट्रस्टकडे जमा असलेल्या निधीबाबत त्यांनी विचारणा केली. सुरक्षिततेसाठी चौकीदार नेमा, जनतेच्या पैशाचे संरक्षण करा असे आवाहन त्यांनी केले. घटनेचा तपास करणाऱ्या पोलिसांना याबाबत लवकरात लवकर आरोपींना पकडा असेही त्यांनी बजावले. यावेळी सरपंच मिना कोटमे, माजी सरपंच शरद लहरे, येवल्याचे नगराध्यक्ष नीलेश पटेल, उपनगराध्यक्ष भारती जगताप आदी उपस्थित होते.