माथाडी कामगारांशी काहीही संबंध नसलेल्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची वर्णी माथाडी मंडळावर लावल्याने ते तत्काळ बरखास्त करावे, अशी मागणी मराठवाडा लेबर युनियनमार्फत सोमवारी करण्यात आली. कामगार उपायुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा काढून माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी व मंडळाचा कारभार पारदर्शकपणे व्हावा, अशी मागणी करण्यात आली.माथाडी कामगार संघटना व मालक संघटनांच्या प्रतिनिधींची संख्या मंडळात समसमान असावी, असे निर्देश आहेत. मागील १० वर्षे माथाडी मंडळाची नियुक्तीच करण्यात आली नव्हती. मराठवाडा लेबर युनियन व महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी मंडळाने पाठपुरावा केल्यामुळे ६ फेब्रुवारी २०१३ रोजी मंडळ नियुक्तीची घोषणा करण्यात आली. मात्र, या नियुक्तीत राजकीय मंडळींचा भरणा असल्याने हे मंडळ तातडीने बरखास्त करावे, अशी मागणी मराठवाडा लेबर युनियनचे सुभाष लोमटे यांनी केली.