मनमाडसाठी पालखेड धरणातून २८ फेब्रुवारीपूर्वी पाणी सोडण्यात यावे, या मागमीसाटी मनमाड बचाओ कृती समितीतर्फे सोमवारी शहरातून मोर्चा काढण्यात येऊन नवीन नगरपरिषद कार्यालय इमारतीचे प्रवेशव्दार बंद करून दिवसभर घेराव घालण्यात आला. आंदोलकर्त्यांनी प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनात महिलांचा सहभाग अधिक होता.
सकाळी एकात्मता चौकात समितीचे कार्यकर्ते व नागरिक मोठय़ा प्रमाणात जमा झाले. त्यानंतर ढोल बडवित, घोषणा देत शहरातील विविध भागातून हा मोर्चा थेट पालिका कार्यालयावर धडकला. या आंदोलनाची पूर्वसूचना पालिका प्रशासनाला चार दिवसांपूर्वीच जाहीर सभेव्दारे देण्यात आली होती. त्यामुळे पालिका इमारतीत नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, मुख्याधिकारी संजय केदार, पाणी पुरवठा सभापती सचिन दराडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र अहिरे आदींसह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. पाणी लवकर सोडण्याच्या आंदोलनकर्त्यांच्या मागणीला आपला पाठिंबा असून त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही पाठपुरावा करीत असल्याचे नगराध्यक्ष पगारे यांनी नमूद केले. आंदोलन मागे घेण्याची विनंती त्यांनी केली. परंतु उपस्थित महिला कार्यकर्त्यांनी घेराव घालून पालिकेचे मुख्य प्रवेशव्दार बंद केले व घोषणाबाजी सुरूच ठेवली. विविध वक्त्यांची यावेळी भाषणे झाली. पालिका प्रशासन, जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्र्यांचा त्यांनी निषेध केला. पालखेडमधून २८ फेब्रुवारीपूर्वी पाणी सोडावे, अशी मागणी त्यांनी केली. बळवंतराव आव्हाड, अशोक परदेशी, सलीम सोनावाला, संतोष बळीद, नाना शिंदे आदींसह विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.