चतुरंग प्रतिष्ठानच्या ‘चतुरंग संगीत सन्मान’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ तबलावादक पं. अरविंद मुळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. संगीत क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल बुजुर्ग संगीत साधकाला या पुरस्काराने गौरविण्यात येते. चतुरंग प्रतिष्ठान आयोजित चैत्रपालवी संगीतोत्सवात हा पुरस्कार पं. मुळगावकर यांना प्रदान केला जाणार आहे. मानपत्र आणि ७५ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच म्हैसकर फाऊंडेशन पुरस्कृत चतुरंग संगीत शिष्यवृत्तीसाठी युवा गायिका भाग्यश्री पांचाळे (बोरिवली) हिची निवड करण्यात आली आहे. शुभेच्छापत्र आणि २५ हजार रुपये असे याचे स्वरूप आहे.
डॉ. विद्याधर ओक, विश्वनाथ शिरोडकर, शुभदा पावगी यांच्या निवड समितीने या  पुरस्कारासाठी पं. मुळगावकर यांची निवड केली. येत्या २६ एप्रिल रोजी सुयोग मंगल कार्यालय, डोंबिवली (पूर्व) येथे सायंकाळी ५.०० वाजता होणाऱ्या चैत्रपालवी संगीतोत्सवात हा पुरस्कार व शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे.