सणासुदीच्या काळातील अपघात रोखण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लक्ष्य’ या मालिकेतील कलाकारांच्या माध्यमातून जनजागृती अभियान हाती घेतले असून त्यामध्ये मद्यपान करून गाडी चालवू नका, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करा आणि वेगमर्यादेचे पालन करा, असे संदेश देण्यात आले आहेत. तसेच ठाणे, भिवंडी, कल्याण आणि डोंबिवली शहरातील वाहतूक समस्येचे निराकरण करण्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून या हेल्पलाइनवर संपर्क साधताच पोलिसांची तात्काळ मदत मिळणार आहे.
दिवाळी सणाच्या काळात अनेकजण एकमेकांच्या भेटीगाठी घेत असतात आणि त्यासाठी त्यांची धावपळ सुरू असते. त्यामुळे या प्रवासादरम्यान अपघात होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे वाहतूक विभागाच्या अभ्यासातून समोर आले आहे. तसेच असे अपघात रोखण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लक्ष्य’ मालिकेतील कलाकारांच्या मदतीने जनजागृती अभियान सुरू केले असून तीनहात नाका येथील वाहतूक शाखेच्या कार्यालय परिसरात या अभियानाचा शुभारंभ झाला. त्यावेळी लक्ष्य मालिकेतील युनिट आठचे कलाकार उपस्थित होते.
या वेळी वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. या अभियानादरम्यान, वाहतूक सुरक्षेचे नियम पाळण्याचे आवाहन या कलाकरांनी केले.
हेल्पलाइन
अभियानांतर्गत जनजागृतीसाठी ठाणे, भिवंडी, कल्याण आणि डोंबिवली शहरातील मॉल व मोक्याच्या ठिकाणी होìडग, फलक लावण्यात येणार आहेत. तसेच पत्रकेही वाटण्यात येणार आहेत. ठाणे, भिवंडी, कल्याण आणि डोंबिवली शहरातील वाहतूक समस्येचे निराकरण करण्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून ८२८६३००३०० आणि ८२८६४००४००, असे हेल्पलाइन क्रमांक आहेत. या क्रमांकावर अपघात किंवा वाहतुकीची समस्या असल्यास कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.