स्तनांचा कर्करोग सरासरी २२ पैकी एका महिलेला होतो असे सर्वेक्षणात आढळून आले असून ७० ते ८० टक्के वेळा रोगाचे निदान शेवटच्या टप्प्यात होते. वयाच्या तिशीनंतर गरोदर राहिलेल्या महिला, स्थूलता तसेच जवळच्या नात्यातील महिलांना स्तनांचा कर्करोग झाल्याचा इतिहास असेल अशा महिलांनाही स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता असते. म्हणून महिलांनी आवश्यक त्या तपासण्या करायला हव्या, असे आवाहन डॉ. ऋचा कौशिक यांनी केले.
‘कॅन्सर पेशंट्स एड असोशिएशन’तर्फे ‘दिलासा’ या संस्थेच्या सहकार्याने महिलांना होणाऱ्या कर्करोगविषयक जनजागृतीपर कार्यक्रमात डॉ. कौशिक बोलत होत्या. माझगाव डॉक लिमिटेडचे डॉ. हिरेन देसाई, गर्भाशयाचा कर्करोगविषयक तज्ज्ञ डॉ. वृंदा करंजगावकर, ‘दिलासा’ संस्थेच्या डॉ. रश्मी फडणवीस तसेच अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, सुकन्या कुलकर्णी या वेळी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला ‘लोकसत्ता’ माध्यम प्रायोजक होता. स्तनांचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग अशा दोन प्रकारच्या कर्करोगांची माहिती, लक्षणे, लवकर निदान व्हावे यासाठीच्या तपासण्या, त्यासाठी महिलांनी करायची तयारी अशी माहिती डॉ. वृंदा करंजगावकर आणि डॉ. रुचा कौशिक यांनी स्लाईड शोच्या मदतीने दिली.
महिलांनी कर्करोग म्हटला की घाबरून जाऊ नये. आपल्याला हा रोग होऊच शकत नाही, असा समजही करून घेऊ नये. कर्करोग म्हटले की ‘अरे बापरे आता सगळे संपले’ असे नसते. सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाले तर दोन्ही प्रकारचा कर्करोग पूर्ण बरा होतो. आपण कर्करोग झालेल्या मुलीची भूमिका एका मालिकेत साकारली तेव्हा त्याविषयीची जाणीव मला झाली, असे सुकन्या कुलकर्णी यांनी सांगितले.
मृणाल कुलकर्णी म्हणाल्या की, ‘तुझ्या माझ्यात’ या चित्रपटात कर्करोगाचे निदान झालेल्या गृहिणीची भूमिका साकारत असताना या रोगाविषयीची भीती, त्याचा मुलांवर, कुटूंबावर होणारा परिणाम, यावरची उपचार पद्धती, किमोथेरपीनंतर केस जाणे या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतला. कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनच्या या स्तुत्य उपक्रमाचा लाभ महिला तसेच पुरुषांनीही घ्यायला हवा.
एकापेक्षा अधिक पुरुषांशी लैंगिक संबंध, कमी वयात लैंगिक संबंध, अनुवांशिकतेमुळे गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग होऊ शकतो. ज्या महिलांची मासिक पाळी संपलेली आणि दीर्घकाळ इस्ट्रोजे या संप्रेरकाचे उपचार त्या घेत आहेत अशा महिलांना हा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. योनीमार्गातून रक्तस्राव होणे, लैंगिक संबंधांनंतर अस्वस्थता वाटणे, ऋतुसमाप्तीनंतर रक्तस्राव होणे अशी त्याची लक्षणे आहेत. तीन वर्षांतून एकदा ‘पॅप टेस्ट’ ही चाचणी करणे आवश्यक आहे. २५ ते ६४ वर्षे या वयोगटातील महिलांना हा आजार होऊ शकतो. प्रतिबंधक उपाय म्हणून लसीकरण करून घेता येते अशी माहिती डॉ. वृंदा करंजगावकर यांनी दिली.
स्वस्तन परीक्षा ही घरच्या घरी महिलांनी कशी करावी याचे सादरीकरण डॉ. ऋचा कौशिक यांनी केले. काखेत, बगलेत, स्तनांच्या जवळ असणारी गाठ तपासणे, स्तनाग्रांची तपासणी साध्यासोप्या पद्धतीने करून लक्षणे आढळल्यास त्वरीत तज्ज्ञ डॉक्टरांना भेटणे असे प्रतिबंधक उपायही महिलांना करता येतील असे डॉ.कौशिक म्हणाल्या. वयाची पन्नाशी ओलांडली नसेल तर मॅमोग्राफी करू नये. स्वस्तनपरीक्षासुद्धा दररोज करून मानसिक ताण ओढवून घेऊ नये, असाही सल्लाही डॉ. कौशिक यांनी दिला. कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनला कशा प्रकारची मदत केली आणि करत राहू याविषयी डॉ. हिरेन देसाई यांनी सांगितले.
कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनच्या संचालक नीता मोरे यांनी असोसिएशन कर्करोग जनजागृती बरोबरच कर्करोगाच्या गरीब गरजू रुग्णांना कशा प्रकारे मदत करते याची सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन संध्या पटवर्धन यांनी केले. कर्करोगविषयक कोणत्याही प्रकारची माहिती तसेच असोसिएशन करीत असलेले काम याची माहिती मिळविण्यासाठी http://www.cancer.org.in  या क्रमांकावर संपर्क साधावा.