लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होऊन एक महिना होत नाही तोच राज्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. केंद्र सरकारला रेल्वे आणि इंधनामध्ये कराव्या लागलेल्या भाववाढीमुळे सामान्य नागरिकांमध्ये सरकारविषयी नाराजी असताना पुन्हा मोदी लाट निर्माण करण्यासाठी पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान आहे.
दोन महिन्यांनी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हे आव्हान कसे पेलायचे? आणि राज्यात पुन्हा मोदी लाट निर्माण कशी निर्माण करावी? या संदर्भात मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला विदर्भातील पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, नागपूर, अमरावती, चंद्रपूर महापालिकेतील पक्षाचे नगरसेवक, जिल्हा परिषदेचे  सदस्य, आमदार उपस्थित राहणार आहेत.
 केंद्र सरकारच्या स्थापनेनंतर केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधीच रेल्वेच्या भाडय़ामध्ये आणि त्यानंतर सामान्य नागरिकांशी दैनंदिन संबंध येणाऱ्या इंधनामध्ये वाढ करण्यात आल्यामुळे  सामान्य नागरिकांमध्ये मोदी सरकारविषयी नाराजी निर्माण झाली आहे. महागाई आणि भ्रष्टाचाराचे मुद्दे घेऊन लढणाऱ्या भारतीय जनता पक्षाने एका महिन्यातच सामान्य नागरिकांना महागाईच्या खाईत लोटल्याने नागरिकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना कसे विश्वासात घ्यायाचे आणि त्यांची मानसिकता कशी बदलायची याबाबत भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान आहे. दुसरीकडे पराभवातून काँग्रेस कसाबसा बाहेर पडल्यानंतर प्रचाराच्या कामाला सुरुवात होत असताना त्यांच्या हातामध्ये महागाईचे आयते कोलीत मिळाल्यामुळे जनतेमध्ये जाऊन या मुद्यावर भाजपचा अपप्रचार सुरू केला आहे. त्यामुळे भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांंसमोर येत्या दोन महिन्यात मोठे आव्हान आहे.
 विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर होणाऱ्या या बैठकीत महायुती करायची की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. जळगावमध्ये झालेल्या राज्यातील संघटन सचिवांच्या बैठकीत भाजपने राज्यात कुठल्याही पक्षाशी युती न करता स्वतंत्र निवडणूक लढवावी, अशी भूमिका अनेकांनी घेतली होती. सध्या महायुतीमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असताना अशा वातावरणात युती न करता स्वतंत्र लढावे या मानसिकतेत भाजपचे अनेक नेते आणि पदाधिकारी आहेत. देशात सध्या नरेंद्र मोदी यांची लाट असल्यामुळे ती विधानसभा निवडणुकीत कायम राहील अशी कार्यकत्यार्ंची भावना आहे त्यामुळे पक्षाच्या राज्यातील कोअर कमिटीने निर्णय घ्यावा, अशी मागणी बैठकीत केली जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विदर्भातील अनेक पदाधिकारी मुंबईला बैठकीसाठी रवाना झाले असून काही उद्या सकाळी विमानाने निघणार आहेत. या संदर्भात शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे यांनी सांगितले, महागाई हे काँग्रेसचे पाप आहे त्यामुळे त्यांना महागाईवर बोलण्याचा अधिकार नाही. सामान्य नागरिकांना महागाईचा फटका बसत आहे हे मान्य असले तरी विधानसभा निवडणुकीच्या आधी महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जातील. जनतेला विश्वास घेणे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान असले तरी लोकांनी काँग्रेस हटाव ही मानसिकता करून ठेवल्यामुळे राज्यात भाजपची सत्ता येईल, असा विश्वास खोपडे यांनी व्यक्त केला.