नवी मुंबई, पनवेल या परिसरात ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली बोकाळणाऱ्या दौलतजादा बार संस्कृतीला चाप लावण्यासाठी पनवेल, बेलापूर, येथील आमदार पुढे सरसावले असून सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईची तयार होणारी बार सिटी ही नवी ओळख पुसून टाकण्यासाठी आवाज उठविणार आहेत. या ऑकेस्ट्रा बारमध्ये सिडको, पालिकेसारख्या निमशासकीय संस्थेतील अधिकाऱ्यांचे पैसे गुंतले असून काही पोलीस अधिकाऱ्यांची या व्यवसायात भागीदारी आहे. त्यामुळे बंद झालेले डान्स बार आता नवीन रूपात ग्राहकांना सामोरे जात आहेत. या बारमध्ये सार्वजनिक ठिकाणी असणारे धूम्रपानबंदी, गुटखाबंदी उघडपणे पायदळी तुडवली जात असून २१ वर्षांखालील मुलांना मिळणारा प्रवेश चिंताजनक आहे. नवी मुंबई पोलिसांनी कमाईचे नवीन साधन म्हणून या ऑर्केस्ट्रा बार संस्कृतीकडे दुर्लक्ष चालविले आहे. कोपरखैरणे येथील नटराज या भरवस्तीत असणाऱ्याा बारची वकिली करण्यासाठी राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाने पुढाकार घेतला आहे. त्याचबरोबर एका बडय़ा नेत्याच्या भावाचा या बारला आशीर्वाद असल्याने पोलिसांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवले आहे. लोकवस्तीत चालणाऱ्या या बारमुळे एमआयडीसीसारख्या निर्जन लोकवस्तीत कामगार वर्ग देशोधडीला लावणारे महापे येथील व्हाईट गोल्डसारखे बार दुपारी एक वाजल्यापासून सुरू होत आहेत. पोलिसांच्या नाकासमोर हे छमछम सध्या जोरात सुरू आहे. पनवेलमध्ये ही बार संस्कृती जोरात फोफावत आहे. येथील एका बारवर काही महिन्यापूर्वी लाचलुचपत विभागाने मारलेल्या छाप्यात करोडो रुपयांची माया जप्त करण्यात आली होती. एका बारमधील डिसेंबरअखेर रात्रीची कमाई २७ करोड रुपये झाल्याची नोंद आहे. ऑर्केस्ट्रा बार आणि त्याबरोबर असलेला वेश्याव्यवसायाचा जोडधंदा पनवेलमध्ये जोरात सुरू आहे.

या व्यवसायातून तरुणाई नष्ट होणार असेल तर ते कधीही सहन केले जाणार नाही. त्यासाठी ऑर्केस्ट्रा बारमध्ये काम करणाऱ्या मुलींचे-महिलांचे पुनर्वसन झाले पाहिजे या मताची मी आहे. पण बारमधील ही दौलतजादा एक बाई आणि आई म्हणून मी सहन करू शकत नाही. त्या विरोधात आवाज उठविणार आहे.
मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर

शहरात अशा प्रकारे दौलतजादा सुरू असल्यास स्थानिक पोलिसांना त्याची तपासणी करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. या संदर्भात कायद्यात असणाऱ्या तरतुदीनुसार कारवाई केली जाईल. ऑर्केस्ट्रा बार मालकांनी कायद्याचे उल्लंघन करू नये. वेळेत बार बंद करून मालकांनी पोलिसांना सहकार्य करायला हवे. सरकारने याबाबत अंतिम निर्णय घ्यावा.
के. एल. प्रसाद, पोलीस आयुक्त, नवी मुंबई</strong>

तरुणाईला उध्वस्त करणाऱ्या डान्स बार संस्कृतीच्या विरोधातील आवाज हा पनवेल मधून सर्वप्रथम उठलेला आहे. त्यानंतर ग्रामीण भागातील तरुणांमध्ये खूप मोठय़ा प्रमाणात जनजागृती झाली. पनवेलची बार सिटी म्हणून असलेली ओळख ही भूषणावह नाही. त्यामुळे या संस्कृतीचा समूळ उच्चाटन व्हावे यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तरुणांची तसेच जनतेची यात साथ लागणार असून छत्रपतींचा हा रायगड जिल्हा पुन्हा अनेक चांगल्या क्षेत्रात अग्रेसर राहिल असा विश्वास आहे. प्रशांत ठाकूर, आमदार, पनवेल