२६/११ च्या हल्ल्यातील मारल्या गेलेल्या प्रत्येक पोलिसांचे बलिदान हे भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या बलिदानाइतकेच श्रेष्ठ आहे. त्यामुळे पोलिसांचा आदर  प्रत्येकानेच राखणे गरजेचे असल्याचे मत अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी व्यक्त केले.
  भाग्यश्री फाऊंडेशन आणि ग्रंथाली यांच्या संयुक्त विद्यमाने संपादित करण्यात आलेल्या लेखिका शिल्पा खेर लिखित ‘सोल्जर इन मी’ या पुस्तकाचे प्रकाशन जागतिक महिला दिनी शिवसमर्थ विद्यालयाच्या पटांगणावर आयोजित करण्यात आले. पुस्तक प्रकाशनानंतर नांगरे-पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला.  
सैनिकी वृत्ती जोपसाण्यासाठी उत्तम साहित्य, चांगले संस्कार आणि योग्य मार्गदर्शन योग्य वयात हाताशी असणे गरजेचे आहे.  वाईट गोष्टींपासून दूर ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर संस्कार करणाऱ्या आई-वडिलांची आहे, असे विचार नांगरे-पाटील यांनी व्यक्त केले.   या वेळी लेखिका शिल्पा खेर, निवृत्त मेजर सुभाष गावंड, ग्रंथालीच्या संपादिका निमंत्रक डॉ. लतिका भानुशाली, वीर माता अनुराधा गोरे उपस्थित होत्या.