आईचे ऋण न फेडता येणारे असते. आईनं आपल्या आयुष्यात जे काही जीवनाचे सार शिकविलेले असते, त्याचे उसने फेडण्याची संधी भा. न. शेळके यांना ‘कासाई’ची गाणी या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनामुळे मिळाली. हा प्रकाशन सोहळा कृतज्ञतेचा असल्याचे मत प्रख्यात कवी इंद्रजित भालेराव यांनी व्यक्त केले.
येथील मेघमल्हार हॉटेलच्या सभागृहात ‘कासाईची गाणी’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा बुधवारी पार पडला. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव, राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे, मराठवाडा साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष नितीन तावडे, भा. न. शेळके, राजेंद्र अत्रे, के. टी. पाटील, एम. डी. देशमुख, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडूकर, गटविकास अधिकारी प्रियदर्शनी मोरे, जिल्हा कोषागार अधिकारी राहुल कदम, भारत गजेंद्रगडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
भालेराव म्हणाले, की जात्याभोवती जिवंत असणाऱ्या कविता कासाईच्या या काव्यसंग्रहातून उमटल्या आहेत. जुन्यात झळकणारं व नव्या यंत्रयुगात चमकणारे हे काव्य आहे. जात्यावरच्या ओव्या माणसाच्या आयुष्याचे प्रतीक हे सुख-दु:खाचे अनुभव भरडूनच या वास्तव ओव्यांची निर्मिती कासाईने केली आहे. कासाईच्या रूपाने एक जिवंत विद्यापीठच जिल्ह्याला लाभल्याचे गौरवोद्गार त्यांनी या वेळी काढले. माझ्या आईनेही हजारो ओव्या मला दिल्या आहेत. आईच्या ओव्याच समोर ठेवून इथपर्यंतची मजल मारल्याचे त्यांनी सांगितले.
भास्कर चंदनशिव म्हणाले, की कासाईने या काव्याच्या रूपाने आपला अंतरात्माच शब्द स्वरूपात आम्हाला दिला आहे. आजच्या काळात जे गरजेचे आहे, त्याच वेळात याचे प्रकाशन झाल्याचा आनंद होतो आहे.
जीवन गोरे म्हणाले, की शेतकरी व बहुजन कुटुंबातील वास्तव जीवन जगत असताना या काव्यसंग्रहातून जीवनाचा अनुभव कुटुंबावरील प्रेम, विचार, भावना या काव्यातून व्यक्त केल्या आहेत. या काव्यसंग्रहात स्त्रीजीवनाचे वास्तव मांडण्यात आले आहे. स्त्री ही अथक श्रम करूनच कुटुंबाची सेवा करीत असते. सहजीवन व सहअस्तित्वाचे तत्त्व प्रत्येकाने अंगीकारावे, असेही ते म्हणाले.
राजेंद्र अत्रे यांनी कासाईनं अनुभवातील संदर्भ ओव्यातून मांडले आहेत. ओव्यातून स्फूर्ती, सकारात्मक विचार देणारे सामथ्र्यही ओव्याच्या माध्यमातून मिळत आहे. हा संग्रह नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठेवा असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविक भा. न. शेळके यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवयित्री भाग्यश्री वाघमारे यांनी काशीबाई शेळके यांची ‘सासुरवास’ ही कविता श्रोत्यांना ऐकवली. सूत्रसंचालन रवींद्र केसकर यांनी तर आभार बालाजी तांबे यांनी मानले.