बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी या हेतूने संपन्न स्वयंरोजगार निर्माण संस्था आणि शुअरशॉट इव्हेंटच्या वतीने येत्या मंगळवारपासून (दि. १२) रविवापर्यंत (दि. १७) महाराष्ट्राची खरेदी जत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
खरेदी जत्राचे उद्घाटन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील यांच्या हस्ते होईल. मदनराव मोहिते अध्यक्षस्थानी असतील. तर कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, मलकापूरच्या नगराध्यक्षा नूरजहाँ मुल्ला, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील पाटील, संचालक प्रकाश पाटील, नगरसेविका स्मिता हुलवान यांची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक महादेव पवार व शुअरशॉटचे संदीप गिड्डे यांनी दिली.
नगर, शिरूर, इंदापूर, पुणे, चिंचवड, धुळे, इस्लामपूर येथे आतापर्यंत ‘महाराष्ट्राची खरेदी जत्रा’ आयोजित करण्यात आली आहे. यंदा प्रथमच येथील मार्केट यार्डमधील बैल बाजार रस्त्यावरील खुल्या जागेत ही जत्रा भरवण्यात येणार आहे. या जत्रेमध्ये १२० दालने असतील. त्यामध्ये महिला बचतगटांना ३० टक्के दालने देण्यात येणार आहेत. त्यामध्ये ऑटोमोबाईल, फर्निचर, होम व किचन अप्लायन्सेस, सौर उपकरणे, खादी व ग्रामोद्योग मंडळाने बनविलेल्या वस्तू, कलाकुसरीच्या वस्तू, आयुर्वेदिक औषधे, सौंदर्यप्रसाधने, कपडे, फुटवेअर आदींचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर खेळ, मनोरंजनासह कोकणी, वऱ्हाडी, खानदेशी विभागातील खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्यात येतील, त्यासाठी फॅब्रिकेटेड स्टॉल उभारण्यात येणार आहेत.