या जत्रेमध्ये शर्यत होईल; परंतु ‘नेहमीच हरणाऱ्या’ सशाशी नाही तर नेटाने आणि सातत्याने धावणाऱ्या आपल्याच भाईबंदांशी. त्यामुळे या शर्यतीमध्ये सगळ्यांचाच कस लागणार आहे. मऊशार वाळूवर स्वच्छंदीपणे धावणारी कासवं समुद्राच्या लाटांवर हेलकावे घेण्यासाठी सुरू असलेली त्यांची पळापळ.. कासवांच्या या लीलांचे याचि देही याचि डोळा दर्शन घडविण्यासाठी कोकणात ‘कासव जत्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. जगभरात सध्या कासवांच्या ऑलिव्ह रीडले प्रजातीच्या संवर्धनासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. तस्कर आणि शिकारी यांचे लक्ष्य ठरल्यामुळे कासवांच्या या प्रजातीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. भारतात ओरिसा, गोवा आणि आता महाराष्ट्रात कासवांचे संवर्धन व जतनासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. त्यादृष्टीने वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर कासव जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘किरात ट्रस्ट’तर्फे १२ ते १७ फेब्रुवारी दरम्यान वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर कासव जत्रा भरविण्यात येणार आहे. कासवाची मादी वाळूमध्ये अंडी घालते. साधारण ५० ते ६० दिवसांनी अंडय़ांतून पिल्ले बाहेर येतात आणि मऊशार वाळूवर मुक्तपणे संचार करतात. समुद्राच्या लाटांवर स्वार होण्यासाठी ही पिल्ले धडपडत असतात. जगात पाऊल ठेवणाऱ्या कासवांच्या पिल्लांचा हा मुक्त विहार पाहण्यात एक आगळाच आनंद आहे. ही कासवलीला याचि देही याचि डोळा पाहण्याची संधी सुहास तोरसकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपलब्ध केली आहे. सहा दिवस चालणाऱ्या या जत्रेत सकाळच्या सत्रात फिल्म शो, तज्ज्ञांशी गप्पा, सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम असा भरगच्च कार्यक्रम होणार आहे. या उपक्रमात सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी करून त्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ‘kirattrust@gmail.com  वर संपर्क साधावा.