प्रसारभारतीच्या मनमानी निर्णयाचा फटका बसलेल्या अनुभवी रेडिओ जॉकी अर्थात ‘आरजें’ना अखेर दिलासा मिळाला आहे. ‘लोकसत्ता’ने एका विशेष बातमीद्वारे या अन्यायाला वाचा फोडली होती.
वयाची पस्तिशी ओलांडलेल्या आरजेंना जुलैपासून डय़ुटी न देण्याचा विचित्र निर्णय प्रसारभारतीने घेतला होता. या अन्यायाला वाचा फोडणारी बातमी लोकसत्तामध्ये ‘पस्तीस प्लस आरजेंशी ३६ चा आकडा’ या मथळ्याखाळी प्रसिद्ध झाली होती. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने व पर्यायाने प्रसारभारतीने या बातमीची गंभीर दखल घेत हा निर्णय मागे घेतल्याची घोषणा मंगळवारी केली. या निर्णयामुळे आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफएम गोल्ड आणि एफएम रेनबो या वाहिन्यांवरील सुमारे १०० आरजेना न्याय मिळाला आहे.
‘लोकसत्ता’मधील हे वृत्त भाजपच्या मुंबई शाखेचे उपाध्यक्ष सुमंत घैसास यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या निदर्शनास आणून दिले होते. प्रसारभारतीचा हा निर्णय अनुचित व असमर्थनीय असल्याचे सांगत जावडेकर यांनी या प्रकरणी व्यक्तिश: लक्ष घालण्याचे आश्वासन घैसास यांना दिले. यानंतर हा निर्णय मागे घेण्याची सूचना प्रसारभारतीला त्यांनी केल्याचे समजते. प्रसारभारतीच्या या निर्णयाचा फटका बसलेल्या आरजेंनीही मुंबई आकाशवाणीकडे ही बंदी मागे घेण्याविषयी निवेदन दिले होते. आकाशवाणीच्या ८७व्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे मंगळवारी हा निर्णय मागे घेतल्याची सूचना प्रसारभारतीकडून आकाशवाणी मुंबईला प्राप्त झाली आणि आरजेंमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
आमच्यावरील अन्यायाला ‘लोकसत्ता’ने वाचा फोडल्यानंतरच या विषयाला निर्णायक गती मिळाली, अशी भावना अनेक आरजेंनी व्यक्त केली. या अनुभवी आरजेंच्या जागी नेमलेल्या तात्पुरत्या आरजेंना जुन्या काळातील गाण्यांचा गंध नसल्याने त्यांच्याकडून अनेक गमतीजमती घडत होत्या. या पाश्र्वभूमीवर आकाशवाणीच्या नियमित श्रोत्यांकडूनही या निर्णयाचे निश्चितच स्वागत होईल.
* निर्थक भीतीपोटी..
देशभरातील आकाशवाणी केंद्रांवर कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या अनेक आरजेंनी वयाची पस्तिशी ओलांडल्याने खासगी एफएम वाहिन्यांशी आकाशवाणी स्पर्धा करू शकणार नाही, या निर्थक भीतीने प्रसारभारतीने या अनुभवी आरजेंना डय़ुटीज देणे थांबविले होते. मात्र, ३५ हे कोणत्याही क्षेत्रातील निवृत्तीचे वय असू शकत नाही, आमच्या वयामुळे कार्यक्रमांच्या प्रसारणावर काहीच विपरीत परिणाम होत नाही, असे या आरजेंचे म्हणणे होते.
* लगेचच रुजू
३५पेक्षा अधिक वय असलेल्या आरजेंना डय़ुटी न देण्याचा निर्णय मागे घेतला असल्याचा निरोप दिल्लीकडून आम्हाला मिळाला असून या आरजेंना आता लगेचच, म्हणजे सोमवारपासून डय़ुटीज दिल्या जाणार आहेत, अशी माहिती आकाशवाणी मुंबईच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने दिली.