अंतरिम रेल्वे अर्थसंकल्पात नागपूरमार्गे जाणाऱ्या तब्बल सात गाडय़ा मिळाल्या असून त्यापैकी एक साप्ताहिक गाडी नागपूरहूनच सुरू होणार आहे. याशिवाय विदर्भातील एका रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणालाही अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे.
रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी आज पूर्णपणे वातानुकूलित अशा १७ ‘प्रिमियम’ गाडय़ांची घोषणा केली. यात नागपूरमार्गे जाणाऱ्या हावडा- पुणे व मुंबई- हावडा या गाडय़ांचा समावेश असून त्या आठवडय़ातून दोन दिवस धावतील. याशिवाय यशवंतपूर ते कटरा (मार्गे गुलबर्गा, काचीगुडा, नागपूर, दिल्ली) आणि पाटणा-बंगलोर (मार्गे मुगलसराय, चाऊकी, माणिकपूर) या आणखी दोन गाडय़ा आठवडय़ातून एक दिवस नागपूरमार्गे जातील. सर्वाधिक व्यस्त अशा मार्गावर धावणाऱ्या या ‘प्रिमियम’ गाडय़ांचे आरक्षण काही दिवस आधीच मिळू शकणार आहे.
नागपूरहून इटारसी, जबलपूर, सतना या मार्गाने रेवा येथे जाणारी नवी साप्ताहिक गाडी सुरू होणार आहे. ती प्रत्यक्ष धावण्यास कालावधी लागणार असला तरी अनपेक्षितपणे ही नवी गाडी नागपूरला मिळाली आहे. गांधीधाम- पुरी ही साप्ताहिक गाडीहीही नागपूरमार्गे जाईल. तिरुवनंतपुरम- निझामुद्दीन ही नवी गाडी आठवडय़ातून दोन दिवस धावणार असून त्यापैकी एक दिवस ती कोट्टायम मार्गे, तर एक दिवस अलेप्पीमार्गे जाईल. एकही नवी पॅसेंजर गाडी विदर्भाच्याच काय, महाराष्ट्राच्याही वाटय़ाला आलेली नाही.
बैतुल- चांदूर बाजार- अमरावती या नव्या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्याची घोषणाही रेल्वेमंत्र्यांनी केली. यामुळे सध्याच्या नरखेड- चांदूरबाजार- अमरावती या मार्गावरील गाडय़ा बैतुलपासूनच वळवणे शक्य होऊन वाहतुकीचा पर्यायी मार्ग उपलब्ध होऊ शकेल. अर्थात हा मार्ग केवळ सर्वेक्षणाच्या टप्प्यावरच आहे. याशिवाय महाराष्ट्रातील आणखी तीन मार्गाचे सर्वेक्षण मंजूर झाले आहे.
महाराष्ट्रातील पुणे- कोल्हापूर, परभणी- परळी व लातूर रोड- कुर्डुवाडी या तीन मार्गाचे दुहेरीकरण करण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली आहे. यामुळे नागपूरमार्गे जाणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेस, नागपूर- कोल्हापूर एक्सप्रेस व दीक्षाभूमी एक्सप्रेस या गाडय़ांना फायदा होणार आहे.