पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत योजनेची संकल्पना मांडली आणि महात्मा गांधी जयंतीदिनी ते स्वत: हातातून झाडू घेणार असल्याने तसेच या योजनेत मंत्री आणि केंद्रीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याचे सूचना देण्यात आल्याने नागपुरातील केंद्रीय कार्यालय परिसर आणि रेल्वे स्थानक, कार्यालय व कॉलनीत स्वच्छता दाखविण्यास एकच लगबग दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्वच कार्यालयचा भर बॅनर आणि त्यासोबत छायाचित्रावरच अधिक भर असल्याचे आढळून आले.
स्वच्छ भारत अभियानात सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना सहभागी होण्यास प्रवृत्त करण्याच्या सूचना आणि त्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे पंतप्रधानांच्या कार्यालयातून जारी करण्यात आली आहेत. अनेक वर्षांपासून २ ऑक्टोबरला सार्वजनिक सुटी मिळत होती. परंतु यंदा सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहावे लागणार आहे. त्यामुळे काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाला असलातरी आपण या उपक्रमात आनंदाने सहभागी होत असल्याचे प्रत्येकजण वरकरणी दाखवता होता. एक दिवस अशाप्रकारे स्वच्छता मोहीम हाती घेतल्याने देशात स्वच्छताबद्दल जागृती होईल काय की, स्वच्छतेचे धडे घरातून, शाळेतून आणि सार्वजनिक उपक्रमातून नियमित चालविण्यात गेले पाहिजे, असा सवाल अनेक केंद्रीय कार्यालय परिसरातील एका कार्यालयालयाच्या अधिकाऱ्यांनी केला. खुद्द पंतप्रधान मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असल्याने आणि तशा स्पष्ट सूचना देण्यात असल्याने नागपुरातील मध्यवर्ती रेल्वे स्थानक, इतवारी, अजनी, मोतीबाग तसेच मध्य व दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे अंर्तगत येणारी विदर्भातील सर्व रेल्वे स्थानके आणि सेमिनरी हिल्स परिसरात असलेले केंद्रीय कार्यालय परिसरात स्वच्छतेसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
रेल्वे स्थानक, कार्यालय आणि कॉलनीतील स्वच्छतेसाठी रेल्वेने प्रत्येक अधिकाऱ्यांना जबाबदारी वाटून दिली आहे. प्रत्येक स्थानकाला २००० रुपये रक्कम देण्यात आली. रेल्वे स्थानक व परिसरात कचरा टाकणऱ्यांना दंड करण्याचे निर्देश देण्यात आले. स्काऊट-गाईडच्या विद्यार्थी रेल्वे स्थानकावर थांबलेल्या गाडय़ा तसेच स्थानकावर जनजागृती मोहीम राबवित आहेत. ते प्रवाशांना परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करीत आहेत.
रेल्वे स्थानक परिसरात कचरा केल्यास ५०० रुपये दंड होऊ शकतो. आपण आपल्या घरी घाण करतो काय, असे ते प्रवाशांना सांगतायेत. याशिवाय २ ऑक्टोबरला मध्य रेल्वे जनजागृती रॅली काढणार आहे. तसेच पथनाटय़तून लोकजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सर्व कार्यालय प्रमुख गांधी जयंतीदिनी आपल्या कर्मचाऱ्यांना स्वच्छता पाळण्याची शपथ देणार आहेत. शिवाय या निमित्ताने रेल्वे अधिकाऱ्यांसाठी स्वच्छ भारत-भारतीय रेल्वेचे योगदान याविषयावर घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली.
नागपूर रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक दहा बाय बारा आकाराचे बॅनर ठेवण्यात आले. त्यावर हम स्वच्छता के लिए वचनबद्ध है असे लिहण्यात आले होते आणि त्याखाली स्वाक्षरी करण्याची सोय करण्यात आली. या उपक्रमाला उंदड प्रतिसाद मिळाला. काही तासात हा बॅनर प्रवाशांच्या स्वाक्षरींनी भरून गेले.