बाहेरगावाहून येणारी गाडी प्लॅटफॉर्मला लागते.. गाडीतून आपले सामानसुमान घेऊन उतरणाऱ्या प्रवाशांची लगबग सुरू होते आणि ते सामान उतरवून घेणारे हमालही प्रवाशांना जाऊन चिकटतात.. बॅगा डोक्यावर वाहून इच्छित स्थळी घेऊन गेल्यानंतर हमाल ठरलेले वाक्य म्हणतात, ‘साहेब, पाठीवर मारा, पण पोटावर मारू नका!’.. पूर्वीच्या काळी सर्रास दिसणारे हे चित्र चाके असलेल्या बॅगा आल्यानंतरही कायम आहे. मात्र हमालांच्या मेहनतान्यावरून म्हणजेच हमालीवरून प्रवासी आणि हमाल यांच्यात होणारे वादही तेवढेच जुने आहेत. याबाबत रेल्वेने दरपत्रक ठरवून दिले असले तरीही ही भांडणे चुकलेली नाहीत. नेमकी हीच बाब हेरून प्रवाशांची लूट होऊ नये आणि हमाल-प्रवासी संघर्ष टळावा या उद्देशाने मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने हमाल-प्रवासी व रेल्वे अधिकारी यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.

रेल्वेने हमालांसाठी दरपत्रक ठरवून दिले आहे. ३७ ते ४० किलो वजनाच्या बॅगेसाठी ३० रुपये, तर हातगाडीवरून १६० किलो वजनाच्या बॅगा घेऊन जाण्यासाठी प्रति फेरी ५० रुपये असे हे दर आहेत. हमाल राखून ठेवायचा असेल, ३० मिनिटांपर्यंत प्रतीक्षा शुल्क घेतले जात नाही. मात्र त्यानंतरच्या काळासाठी ३० रुपये एवढे प्रतीक्षा शुल्क आकारले जाते. हे दरपत्रक रेल्वेनेच ठरवले असले तरी अनेकदा हमाल व प्रवासी यांच्यात हमालीवरूनच वादावादी होते. अनेकदा हमाल ठरावीक दरापेक्षा जास्त पैसे मागतात, तर अनेकदा प्रवासीही २०-२५ रुपयांवर हमालांची बोळवण करतात.
हा वाद टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने पुढाकार घेत विविध स्थानकांवर स्टेशन अधीक्षक, प्रवासी आणि हमाल यांची एकत्रित बैठक घेण्याचे ठरवले आहे. या बैठकीत रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारीही सहभागी होणार आहेत. या बैठकांमध्ये हमालांच्या समस्या जाणून घेणे, प्रवाशांना हमालांच्या दरांबाबत जागरूक करणे, आदी गोष्टींवर भर देण्यात येणार आहे.