मध्य रेल्वेवर तिकीट तपासनीसांची वानवा असताना कार्यरत असलेल्या तिकीट तपासनीसांवरही सध्या ‘टार्गेट’चा ताण आहे. या तिकीट तपासनीसांना दर दिवशी तब्बल १५०० ते ३००० रुपये दंडवसुलीचे लक्ष्य ठरवून दिले आहे. मात्र विनातिकीट प्रवास करताना पकडले जाऊनही होणारी प्रवाशांची अरेरावी, तिकीट तपासनीसांसाठी संरक्षणाचा अभाव आणि तिकीट तपासनीसांच्या संख्येत झालेली घट आदी गोष्टींमुळे तपासनीस हे लक्ष्य पूर्ण करण्यात अपयशी ठरत आहेत. त्यातच आता सुटय़ांचा मोसम सुरू होणार असल्याने हा ताण अधिक वाढणार असल्याचे तिकीट तपासनीसांचे म्हणणे आहे.
मध्य रेल्वेवर तिकीट तपासनीसांच्या मंजूर संख्येपेक्षा तब्बल हजार तपासनीस कमी आहेत. सध्या मध्य रेल्वेवर १२००च्या आसपास तिकीट तपासनीस आहेत. त्यापैकी ५०० तिकीट तपासनीस मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांवर आणि लोकलमध्ये कार्यरत असतात. उपनगरीय विभागात काम करणाऱ्या तपासनीसांना दर दिवशी १५०० रुपये दंड वसूल करण्याचे लक्ष्य रेल्वेतर्फे देण्यात आले आहे, तर मेल-एक्स्प्रेसमध्ये काम करणाऱ्या तपासनीसांना तीन ते चार हजार रुपये दंडवसुलीचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य आरामात गाठता येईल, मात्र तिकीट तपासनीसांना कोणतेही संरक्षण नसल्याने या लक्ष्यापर्यंत पोहोचणे कठीण जात आहे, असे मध्य रेल्वेवरील तिकीट तपासनीस आनंद पावले यांनी सांगितले.
विनातिकीट प्रवास करताना पकडलेल्या प्रवाशाने आपली चूक मान्य करून मुकाटपणे दंडाची रक्कम भरून पावती घेतल्याचे उदाहरण खूप दुर्मीळ आहे. आजकाल १६ वर्षांच्या मुलालाही विनातिकीट प्रवास करताना पकडले, तरी तो खिशातला मोबाइल काढून कोणाला तरी फोन लावतो. मग अशा प्रवाशांना सोडून देण्याबाबत आमच्यावर दबावही टाकण्यात येतो. अनेकदा प्रवासी हातावर शंभर रुपये टेकवून ‘आमच्याकडे एवढेच पैसे आहेत,’ असे सांगतात. काही जण उलट आमच्याच अंगावर आवाज चढवतात, असेही पावले यांनी नमूद केले. अशा प्रवाशांना कायदेशीर कारवाईसाठी रेल्वे सुरक्षा दलातील जवानांच्या ताब्यात दिल्यास त्या विभागातूनही सहकार्य मिळत नसल्याचे पावले यांनी सांगितले.
विनातिकीट प्रवाशांवरील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया किचकट आहे. त्यांची वैद्यकीय चाचणी करावी लागते, त्यांना कोठडीत खायला द्यावे लागते आणि मग त्यांना न्यायालयात सादर केले जाते. या प्रक्रियेत वेळ जातो. म्हणूनही रेल्वे सुरक्षा दलातर्फे निरुत्साह असावा, असे एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. मात्र विनातिकीट प्रवाशांविरोधात रेल्वे सुरक्षा दल कठोरपणे कारवाई करत असल्याचा दावा रेल्वे सुरक्षा दलाचे मुंबई विभागीय सुरक्षा आयुक्त आलोक बोहरा यांनी सांगितले.