मासिक किंवा त्रमासिक पास काढण्यासाठी वास्तव्याचा दाखला देणे आणि पास काढताना पत्ता नोंदवणे रेल्वेने अनिवार्य केले असले, तरी हा पत्ता टंकलिखित करणे आणि त्यानंतर पास मुद्रित करणे यात प्रवासी व कर्मचारी यांचा बराच वेळ खर्ची पडणार, हे नक्की! त्यातच मध्य रेल्वेकडे सर्वच स्थानकांवर डॉट मॅट्रिक्स पद्धतीची तिकीट मुद्रणयंत्रे (प्रिंटर्स) असल्याने हा वेळ जास्त लागत आहे. पूर्वीच्या तुलनेत सध्या तिकीट काढण्यासाठी ८-१० सेकंद जास्त वेळ लागतो. मात्र यापुढे पास काढण्यासाठी त्याहीपेक्षा जास्त वेळ लागणार आहे.
मध्य रेल्वेच्या ७४ स्थानकांवर संगणकीय तिकीटप्रणाली अस्तित्वात येण्याआधी तिकिटांवर ठसा उमटवून ती दिली जायची. या पद्धतीत १०-१५ सेकंदांत तीन ते चार प्रवाशांना तिकीट देऊन होत असे. मात्र संगणकीयप्रणाली सुरू झाल्यानंतर एवढय़ा वेळात जेमतेम एका प्रवाशाला तिकीट देणे शक्य होते. रेल्वे सध्या डॉट मॅट्रिक्स पद्धतीचे मुद्रणयंत्र वापरत असल्याने हा वेळ जास्त लागतो. मात्र रेल्वेने लेझर पद्धतीचे मुद्रणयंत्र स्थानकांवर ठेवल्यास तिकीट मुद्रणासाठी कमी वेळ लागेल, असा प्रवासी संघटनांचा दावा आहे.
सध्या मध्य रेल्वेच्या ७४ स्थानकांवर ४३२ तिकीट खिडक्या आहेत. या ४३२ तिकीट खिडक्यांसाठी ६५० मुद्रणयंत्रे आहेत. या ६५० यंत्रांपैकी ५०० यंत्रांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी वार्षिक करारही झाला आहे. यापैकी ५० यंत्रे नादुरुस्त आहेत. रेल्वेच्या तिकीट मुद्रणासाठी वापरली जाणारी मुद्रणयंत्रे नादुरुस्त होण्याचे प्रमाण जास्त आहे. दर दिवशी या मुद्रणयंत्रांतून लाखो तिकिटे मुद्रित होतात. त्यामुळे मुद्रणयंत्रे लवकर बिघडतात. त्यामुळेच अजून ३०० मुद्रणयंत्रे विकत घेण्याची गरज आहे. मात्र त्यापैकी फक्त ७० यंत्रेच मिळणार असल्याचे तिकीट आरक्षण आणि मुद्रण विभागाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले. ही नवीन मुद्रणयंत्रे लेझर पद्धतीची घ्यावीत, अशी मागणी प्रवासी व कर्मचारी संघटनांनी केली आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. नवीन नियमाप्रमाणे पास काढण्यासाठी आता प्रवाशांना अधिक वेळ खर्च करावा लागणार आहे.