मुंबईतील पावसाळा आणि लोकल ट्रेन यांचे विळ्याभोपळ्याचे सख्य मुंबईकरांना खूपच महागात पडते. प्रचंड पावसाची सवय असलेल्या मुंबईतील रेल्वेसेवा मात्र या पावसाळ्यात कूर्मगतीने चालू लागते. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने प्रसंगी ठप्पही होते. मात्र मध्य आणि पश्चिम रेल्वेने गेल्या दोन तीन वर्षांपासून या पावसाला तोंड देण्यासाठी कंबर कसून तयारी सुरू केली आहे. यंदाही या दोन्ही रेल्वेमार्गावर मान्सूनपूर्व कामे मे महिन्याच्या अखेपर्यंतच पूर्ण करण्यात येणार असून नालेसफाई, ट्रॅकची देखभाल, झाडांच्या फांद्या छाटणे आदी कामे ९५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
पाणी उपसण्यासाठी पंप
मुंबईची भौगोलिक स्थिती पाहता उंचसखल भागामुळे रेल्वेमार्गावर पाणी तुंबते. या पाण्याचा निचरा करण्यासाठी किंवा पाणी उपसण्यासाठी पश्चिम रेल्वेवर डिझेलचे ८० पंप आणि मध्य रेल्वेवर रेल्वेचे २३ आणि महापालिकेचे १६ असे ३९ पंप बसवण्यात येणार आहेत. पाणी तुंबण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पश्चिम रेल्वेवरील मरीन लाइन्स, मुंबई सेंट्रल, दादर, माटुंगा रोड, माहीम, वांद्रे, अंधेरी, बोरिवली, नालासोपारा आणि विरार आदी ठिकाणी हे पंप असतील. तर मध्य रेल्वेवर मशीद बंदर, माझगाव यार्ड, भायखळा, करीरोड, शीव, कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर, नानीपाडा, ठाणे, डोंबिवली, शिवडी, वडाळा, चुनाभट्टी, कोपरखैरणे, चिंचपोकळी, परळ, विद्याविहार, नाहूर, भांडुप आदी स्थानकांच्या आसपास पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप बसवण्यात आले आहेत.
नालेसफाई
पश्चिम रेल्वेमार्गावरील सर्व ४३ नाल्यांची सफाई करण्याचे काम पूर्ण होत आले आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेने निधी दिला आहे. नालेसफाईचा पहिला टप्पा ३० मेपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर गरजेनुसार दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात सफाई केली जाईल. मिठी नदी, धारावी नाला, पोईसर नाला आदी मोठय़ा नाल्यांची सफाई पालिका करणार आहे. मध्य रेल्वेवर छोटेमोठे ८७ नाले असून त्यापैकी ८४ नाल्यांची सफाई पूर्ण झाल्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केला आहे. तर उर्वरित नाल्यांची सफाई ३१ मेपर्यंत पूर्ण होणार आहे.
डब्यांची डागडुजी
मुंबईतील पावसाचा जोर लक्षात घेता रेल्वेला लोकल गाडय़ांच्या डब्यांचीही डागडुजी करावी लागते. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या कारखान्यांमध्ये लोकल गाडय़ांच्या डब्यांमध्ये गळती आहे का, डब्यांमधील विद्युत यंत्रणा आदींबाबत डागडुजी सुरू असून सर्व गाडय़ांची देखभाल दुरुस्ती केली जाईल.
डिजिटल अ‍ॅक्सेल काउंटर
मध्य रेल्वेने पावसाळ्यात होणारे सिग्नल यंत्रणेतील बिघाड टाळण्यासाठी हार्बर तसेच मुख्य मार्गावर यंदा ९५०हून अधिक डिजिटल अ‍ॅक्सेल काउंटर बसवले आहेत. पश्चिम रेल्वेवर हे काम आधीच करण्यात आले आहे. आता मध्य रेल्वेवरील डिजिटल अ‍ॅक्सेल काउंटरची संख्या दोन हजारांपेक्षा जास्त असून त्यामुळे येत्या पावसाळ्यात पाणी तुंबले, तरी सिग्नल यंत्रणा चालू राहणार आहे.
मोठय़ा भरतीचे वेळापत्रक
दिवस    वेळ    उंची
५ जून    १४.१८    ४.५८ मीटर
६ जून    १५.०२    ४.५६ मीटर
१६ जून    १२.२३    ४.६१ मीटर
४ जुलै    १४.००    ४.७२ मीटर
५ जुलै    १४.४४    ४.७५ मीटर
२ ऑगस्ट    १३.३७    ४.८४ मीटर
३ ऑगस्ट    १४.२०    ४.८६ मीटर
३१ ऑगस्ट     १३.०९    ४.८७ मीटर