उपनगरी प्रवाशांना तकिीटे काढण्यासाठी रांगेत उभे राहण्यास लागू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने विविध यंत्रणा वापरात आणल्या असल्या तरी एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात प्रवाशांच्या मागचे रांगेचे शुक्लकाष्ठ कायमच राहिले आहे. एटीव्हीएम (अ‍ॅटोमेटीक तिकीट व्हेंडीग मशीन) यंत्रणा नादुरूस्त करून जेटीबीएस (जनसाधारण तिकीट बुकींग सेवक) द्वारे तिकीटे अधिकाधिक विकण्यात येत आहेत. सीव्हीएम बंद, एटीव्हीएम नादुरूस्त आणि जेटीबीएससाठी परत बाहेर जाणे नको यासाठी प्रवासी परत तिकीटांच्या रांगेतच उभे राहणे नाइलाजाने पसंत करत आहेत.
कोणत्याही उपनगरी रेल्वे स्थानकावरल रेल्वे प्रवाशांच्या तिकीटासाठी प्रचंड रांगा असतात. या रांगामध्ये प्रवाशांनी आपला वेळ घालवू नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून उपनगरी गाडय़ांत तसेच रेल्वे स्थानकांवर सतत उदघोषणा करून एटीव्हीएमचा सढळ वापर करण्याचे आवाहन करण्यात येत असते. अनेक स्थानकांवर निवृत्त रेल्वे कर्मचारी या मशीन्सवर प्रवाशांना तिकीटे काढून देण्यासाठई उपलब्ध असतात. मात्र मध्य रेल्वेवर कुर्ला, गोवंडी, चेंबूर, मानखुर्द, घाटकोपर आदी ठिकाणी जेटीबीएस यंत्रणा मोठय़ा प्रमाणात कार्यान्वित आहे. प्रत्येक तिकीटामागे एक रुपया अतिरिक्त देऊन प्रवाशांना अशा जेटीबीएसवरून तिकीट मिळत असते. ही यंत्रणा खासगी व्यक्तींकडे रेल्वेने सुपूर्द केली आहे. कुर्ला आणि गोवंडी येथे सर्वाधिक जेटीबीएसवरून तिकीटे काढण्यात येतात असे मध्ये रेल्वेकडून सांगण्यात येते.
कुर्ला रेल्वे स्थानकाच्या पूर्वेस असलेल्या चार एटीव्हीएम मशीन्स दोन आठवडे पूर्ण बंद होती. ही मशीन्स सतत बंद पडत असून जाणीवपूर्वक ही मशीन्स बंद पाडण्यात येतात. येथे जेटीबीएस यंत्रणा चालविणाऱ्या दुकानांतील काही व्यक्ती थेट प्रवाशांच्या रांगेत शिरून त्यांना जबरदस्तीने आपल्या दुकानांमधून तिकीटे खरेदी करण्यास भाग पाडतात. एटीव्हीएम मशीन्स दुरूस्त होणार नाहीत याचीही काळजी येथील लोकांकडून घेण्यात येत असते. यात काही रेल्वे कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचे सांगण्यात येते. रेल्वेच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाकडून मात्र या मशीन्सचे संरक्षण करण्याबाबत टाळाटाळ करण्यात येते. हाच प्रकार गोवंडी आणि मानखुर्द येथेही सुरू असून जाणीवपूर्वक एटीव्हीएम बंद पाडण्यामागे नेमके काय इंगित आहे, याचा शोध घेण्याची मागणी उपनगर रेल्वे प्रवाशांकडून करण्यात येत आहे.