रायगड जिल्ह्य़ातील उरण तालुक्याची ओळख भाताचे कोठार म्हणून होती, मात्र सध्या या तालुक्यात मोठय़ा प्रमाणात उद्योगांची निर्मिती होत असल्याने येथील भातशेतीचे प्रमाण घटलेले असून शिल्लक असलेल्या जमिनींवर शेतकऱ्यांनी भाताच्या सुक्या पेरण्या केल्या होत्या. तसेच अनेकांना भाताचे रोव(मोड)आलेल्या बियाणांचीही पेरणी केलेली होती. शेताच्या मशागतीची कामेही जोरात सुरू झाली आहेत. मात्र अचानकपणे पावसाने दडी मारल्याने उरणमधील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे.
उरण तालुक्याचे पूर्व व पश्चिम असे दोन भाग आहेत. खोपटा खाडीमुळे उरण तालुक्याचे दोन भाग पडलेले असून तालुक्याचा पश्चिम भाग सिडको संपादित नवी मुंबई परिसरात मोडत आहे. चाळीस वर्षांपूर्वीच येथील शेती उद्योगांसाठी संपादित करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील निम्मी भातशेती कमी झालेली आहे. तर तालुक्याच्या पूर्व विभागात आजही शेती शिल्लक असल्याने येथील शेतकरी ती करीत आहेत. या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असल्या तरी भातशेती ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. दरवर्षी मान्सूनपूर्वी करण्यात येणारी सुकी भाताची पेरणी वाया जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. त्याचप्रमाणे मुसळधार पावसाचाही परिणाम भातशेतीवर होत आहे. या वर्षी उरण तालुक्यात २४ हजार ६०० हेक्टर जमिनीवर भातपिकाची लागवड करण्यात आल्याची माहिती उरणचे कृषी अधिकारी के. एस. वेसावे यांनी दिली आहे. तसेच शेतकऱ्यांनी शक्यतो रोव पद्धतीचे बियाणे पेरण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे. वेळेत पावसाने हजेरी न लावल्यास सुरुवातीला पेरणी केलेली बियाणी अतिपावसामुळे वाहून गेली आहेत. तर नंतर पावसाने दडी मारल्याने करपू लागली आहेत. त्यामुळे या वर्षीही शेतकऱ्यांच्या हाती पीक लागण्याची शक्यता कमी असल्याची भीती पिरकोन येथील शेतकरी विलास गावंड यांनी व्यक्त केली आहे.