मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने काही भागात जोर पकडल्यामुळे धरणांच्या जलसाठय़ात वाढ होऊ लागली आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सुमारे ४०० दशलक्ष घनफूट जलसाठा वाढल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. इगतपुरी व त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाचे प्रमाण चांगले असल्याने त्या भागातील धरणांमध्ये पाणी जमा होत आहे. ग्रामीण भागात पेरणीच्या कामांनीही जोर पकडला आहे. परंतु, काही भागात मात्र अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
जवळपास पावणेदोन महिने हुलकावणी दिल्यानंतर रिमझिम स्वरूपात पावसाचे आगमन झाले. मध्यंतरी एक-दोन दिवस त्याने विश्रांती घेतली. त्यानंतर पुन्हा जोर पकडला. परंतु, पावसाचा हा जोर काही विशिष्ट तालुक्यांपुरताच मर्यादित आहे. मागील चोवीस तासांत झालेल्या पावसाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास ही बाब लक्षात येते. या काळात १६९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारी सकाळपासून नाशिक शहर, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या ठिकाणी संततधार सुरू होती. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३९१६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गतवर्षी या कालावधीत हे प्रमाण जवळपास दुप्पट म्हणजे ८७७३ मिलीमीटर होते. प्रारंभीच्या दीड ते पावणेदोन महिने कोरडे राहिल्यानंतरही पावसाने आता जोर पकडला असला तरी ही कसर कशी भरून निघणार हा प्रश्न आहे. सध्या काही विशिष्ट भागांत समाधानकारक तर काही भागांत जेमतेम स्वरूपाचा पाऊस आहे.
१ जून ते २८ जुलै या कालावधीत नाशिक तालुक्यात १५२ मिलीमीटर (मागील वर्षी १५२ मिलीमिटर), इगतपुरी ९५२ (२१४५), दिंडोरी २५७ (४५१), पेठ ५९१ (१३०९), त्र्यंबकेश्वर ४५५ (११७९), मालेगाव १७९ (३५०), नांदगाव २८ (२५५), चांदवड ९५ (२०९), कळवण १८१ (३०९), बागलाण १५३ (३०७), सुरगाणा ४११ (९१८), देवळा १२२ (२३५), निफाड १२९ (२५५), सिन्नर ९७ (२६७), येवला ६२ (२०९) असा पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर दिसत आहे. उर्वरित भागात पाऊस सुरू असला तरी त्यामुळे टंचाईचे संकट दूर होईल अशी शक्यता नाही.
ज्या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर आहे, त्या भागात पेरणीच्या कामांनीही वेग पकडला आहे. शिवाय, त्या भागातील धरणांमध्येही जलसाठा होण्यास सुरुवात झाली आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात मागील आठवडय़ात १८०० दशलक्ष घनफूट जलसाठा होता. त्र्यंबकमधील पावसामुळे त्यात ४०० दशलक्ष घनफूटची भर पडली असून तो आता २१७८ दशलक्ष घनफूटवर पोहोचला आहे. शहरवासीयांच्या दृष्टीने हे धरण भरणे महत्त्वाचे आहे. त्यात काही अवरोध आल्यास पुढील वर्षभर कपातीची टांगती तलवार कायम राहू शकते. इतर काही धरणांच्या जलसाठय़ात वाढ होत आहे. त्यातील बहुतेक धरणे कोरडी ठाक पडली होती. त्यात काश्यपी (७९), गौतमी-गोदावरी (१७२), पालखेड (८०), करंजवण (५९७), वाघाड (१६९), दारणा (३७६१), भावली (७०६), मुकणे (५४०), वालदेवी (१९४), कडवा (१३७), चणकापूर (४७६), पुनद (६०१), हरणबारी (३८४), जलसाठा आहे. जिल्ह्यातील २३ धरणांची एकूण क्षमता ६६,३५४ दशलक्ष घनफूट असून सध्या त्यात केवळ ११,४३९ दशलक्ष घनफूट म्हणजे १७ टक्के जलसाठा आहे.