कुठे रिमझिम तर कुठे जोरदार सरी, असे विदर्भातील विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. जिल्ह्य़ात काटोल, सावनेर, उमरेड या भागात पावसाच्या दोन दिवसात जोरदार पाऊस झाला, मात्र शहरात आज दिवसभर टप्प्याटप्प्याने पावसाच्या रिमझिम सरी आल्या. दरम्यान, या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे.
दोन दिवसांपासून शहरात पावसाळी वातावरण असून सूर्यदर्शन झाले नाही. रविवारी रात्री काही काळ पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आज सकाळपासून पावसाच्या सरी शहराच्या काही भागात आल्या. जिल्ह्य़ातील काही भागात चांगला सरी आल्या. मात्र, त्याच वेळी शहरातील काही भाग कोरडा होता. दुपारनंतर पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात झाली. थोडय़ाथोडय़ा अवकाशानंतर येणाऱ्या सरींमुळे वातावरणातही गारवा निर्माण झाला. छत्तीसगढ आणि विदर्भात मान्सून सक्रिय झाल्याने पावसाला सुरुवात झाल्याचा दावा हवामान खात्याने केला आहे. विदर्भाच्या सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे. नागपुरात पावसाच्या हलक्या सरी येत असल्या तरी यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती, वर्धा जिल्ह्य़ाच्या काही भागात दोन दिवसात चांगला पाऊस झाला आहे. यवतमाळ येथे ४६ मि.मी., वरोऱ्यात ४५ मि.मी., काटोल ४०मि.मी., सावनेर ४०.६ मि.मी., अमरावती ३९ मि.मी., कळंब ३५ मि.मी., पांढरकवडा ३४ मि.मी., पातूर २५ मि.मी., वर्धा ६६ मि.मी., देवळी ६३ मि.मी., हिंगणघाट ५६ मि.मी., उमरेड ४९.९ मि.मी., सेलू ४५ मि.मी., गडचिरोली ४२ मि.मी., दारव्हा ४१ मि.मी. तर मनोऱ्यात ४० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. समुद्रपूर, सालेकसा, सिंदखेडराजा, देऊळगावराजा, अंजनगावसूर्जी, मारेगाव, आर्णी, कोरची, कुरखेडा, अहेरी, कोरपना, गोंडपिंपरी, चिमूर, वणी, चांदूर रेल्वे, मोर्शी, परतवाडा येथेही चांगला पाऊस झाला.
शहरातील विविध भागात सध्या ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सतर्फे (ओसीडब्ल्यू) पाईप लाईन आणि नळ जोडणीचे काम सुरू असल्यामुळे रस्ते खोदून ठेवण्यात आले आहे. विशेषत: पूर्व, मध्य आणि उत्तर नागपुरातील विविध भागातील झोपडपट्टी भागात रस्त्याचे खोदकाम करण्यात आल्यामुळे नागरिकांना रस्त्याने पायी जाणे कठीण झाले आहे. डांबरीकरणाचे काम अर्धवट स्थितीत आहे. संततधार पावसामुळे शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांंची उपस्थित कमी होती. आठवडय़ाचा पहिला दिवस असल्यामुळे चाकरमानी रेनकोट घालून कार्यालयात गेले.
शहरातील विविध भागातील चौकातील चहाच्या टपरीवर चहाचा आनंद घेणारे दिसून आले.