मागील आठवडय़ापासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाने चांगलाच जोर धरल्याने पिकांना जीवदान मिळण्यासह पिण्याच्या पाण्याची तसेच जनावरांच्या चाऱ्याची समस्या दूर होण्यास मदत झाली आहे. विशेषत: टंचाईची स्थिती असणाऱ्या चांदवड, निफाड, येवला, देवळा, सटाणा, मालेगाव या तालुक्यांमध्येही बऱ्यापैकी प्रमाणात पाऊस झाल्याने खऱ्या अर्थाने बळीराजा सुखावल्याचे चित्र दिसत आहे.
ऑगस्ट अखेपर्यंत जिल्ह्यातील नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, कळवण या तालुक्यांमध्ये पावसाची स्थिती उत्तम असताना सटाणा, मालेगाव, देवळा, चांदवड, निफाड, येवला, सिन्नर या तालुक्यांमध्ये मात्र टंचाईसदृश्य परिस्थिती कायम होती. पहिल्या एक-दोन पावसाच्या भरवशावर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले होते. तर, पाऊसच नसल्याने काही शेतकऱ्यांनी पेरण्याही केल्या नव्हत्या. नद्या-नाले, तलाव कोरडेठाक असल्याने विहिरींना पाणी उतरण्याची शक्यताही मावळली होती. सिन्नरसह सटाणा, मालेगाव तालुक्यातील काही भागांमध्ये टंचाईची स्थिती अधिक भयावह होती. ऐन पावसाळ्यातही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दूपर्यंत भटकंती करावी लागत होती. त्यातच चाऱ्याची उपलब्धता नसल्याने जनावरे सांभाळणे म्हणजे शेतकऱ्यांना संकट वाटू लागले होते. सटाणा तालुक्यातील ताहाराबाद परिसरात पावसामुळे परिस्थिती बऱ्यापैकी असताना उर्वरित तालुका मात्र पावसासाठी आसुसलेला होता. माळमाथ्यासह मालेगाव तालुक्याचा बहुतांशी भाग कोरडाच होता. अनेक शेतकऱ्यांना खरिपातील नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नसताना रब्बीतही त्यांच्यावर भरपाई मागण्याची वेळ येते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यातही ज्यांना शक्य होते त्या शेतकऱ्यांनी डाळिंब बागा जगविण्यासाठी २०० ते ५०० रूपये प्रति टँकर असे पैसे मोजले. ज्यांना हे शक्य नव्हते त्यांनी बागा देवाच्या भरवशावर सोडून दिल्या. अशीच स्थिती सिन्नर, चांदवड या नेहमीच दुष्काळ सहन कराव्या लागणाऱ्या तालुक्यांमध्ये दिसून आली. तर, निफाड, येवला या तालुक्यांत द्राक्षबागा आणि कांदा पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू होती.
सप्टेंबर उजाडला आणि हवामानात झपाटय़ाने झालेल्या बदलामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील चित्रच बदलले. संपूर्ण जिल्ह्यात संततधारेने नद्या-नाल्यांना पूर आले. देवळ्याची आरम, सटाण्याची मोसम या नद्यांना चार ते पाच वर्षांनंतर पूर गेला. त्यामुळे नद्यांमध्ये साचलेली घाणही वाहून गेली. धरणांमधील जलसाटय़ात वाढ झाली. पिके तग धरतील असे चिन्ह दिसू लागले. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला. दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला. खरिपाने साथ दिली नसली तरी रब्बीचा हंगाम घेता येऊ शकेल असे आशादायक वातावरण आता निर्माण झाले आहे.