मनसेचे नेते राज ठाकरे हे सोमवार व मंगळवार असे दोन्ही दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. मंगळवारी होणारी त्यांची सभा उच्चांकी होईल, असे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मनसेचे कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख यशवंत किल्लेदार यांनी रविवारी पत्रकारांना दिली. ते म्हणाले, सोमवारी दुपारी ३ वाजता ठाकरे यांचे पॅव्हेलियन हॉटेलमध्ये आगमन होणार आहे. तिथे जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीवेळी त्यांचे मार्गदर्शन होणार आहे. नंतर ते पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारणार आहेत. सायंकाळी निमंत्रित मान्यवरांशी त्यांची चर्चा होणार आहे.     
मंगळवारी दुपापर्यंत ते कोणालाही भेटणार नाहीत. सायंकाळी महालक्ष्मीचे दर्शन घेऊन ते थेट गांधी मैदानातील जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत. या सभेला सुमारे दीड लाख लोक उपस्थित राहतील. तिथे मोठे व्यासपीठ उभारण्यात आले असून स्क्रीनची सोय करण्यात आली आहे. मनसेमध्ये प्रवेश करण्यासाठी काहींनी संपर्क साधला आहे. याबाबत ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाणार आहे, असेही किल्लेदार त्यांनी सांगितले.