श्रावण महिना सुरू झाला की सण, उत्सवास सुरुवात होते. बहीण-भावाच्या उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा रक्षाबंधन हा सण श्रावण शुद्ध पौर्णिमेस साजरा होतो. भारतीय संस्कृतीत बहीण-भावाचे नाते हे भावनिक धाग्याच्या बंधनात गुंफले गेले आहे.  हे बंधन आता केवळ  एका धर्मापुरतेच मर्यादित न राहता ते सर्वधर्मसमभावात सामावले गेले आहे. कर्तव्य आणि प्रेमाचे प्रतीक असलेला हा रक्षाबंधन सोहळाच नव्हे तर सर्व धर्मीयांचे सण, उत्सव सर्वत्र मिळूनमिसळून मोठय़ा उत्साहाने साजरा होत असतात. सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरातही गेली अनेक वर्षांपासून ही परंपरा अजूनही टिकून आहे..

प्रेमाचे नाते जपणारी अफ्जादीदी
समाजामधील विविध राजकीय पक्षांचे नेते व्यासपीठावरून मोठय़ा आवाजात धर्माच्या एकात्मतेचा संदेश देतात, परंतु हाच संदेश वास्तवात जपणारे मंडळी कमी आहेत. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जपणाऱ्यांपैकी पनवेल शहरामधील शेखर देशमुख आणि अफ्जा पाडे ही दोन कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून रक्षाबंधन सण साजरा करून धर्माचा एकोपा जपत आहेत.
३९ वर्षीय अफ्जा आई-वडिलांसोबत वीस बाय दहाच्या खोलीत पनवेल शहरातील पटेल मोहल्ला येथे राहतात. अफ्जादीदी अशी त्यांची ओळख. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या अफ्जा या परिसरात सामाजिक कार्यकर्त्यां म्हणून काम करतात. महिलांच्या अत्याचारासाठी पुढाकाराने काम केल्याने त्या मोहल्ल्यासह पनवेल परिसरात चर्चेत आल्या. याच ओळखीने त्यांना पनवेल नगर परिषदेचे माजी नगरसेवक शेखर देशमुख यांच्यापर्यंत पोहोचवले. मुळात देशमुखांच्या पत्नी विभावरी यांची अफ्जा मैत्रीण. आज याच अफ्जा देशमुख कुटुंबीयांचा एक घटक बनल्या आहेत.
देशमुख दाम्पत्यांनी याआधी नगर परिषदेमध्ये जनसेवेचा वसा जपत लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. पनवेलमधील मोहल्ला परिसरातच देशमुख कुटुंबीय राहायला होते. पनवेलमध्ये घडलेल्या दोन दंगलींचे देशमुख कुटुंबीय साक्षीदार आहेत. आपल्या घरापासून धर्म एकोप्याचे धडे देशमुख यांनी त्यांच्या कृतीमधून त्यांच्या दोन्ही मुलांना दिले. ९० वर्षांच्या थकलेल्या आई-वडिलांना स्वत:च्या कष्टावर जगवताना राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या अफ्जा यांच्या धडाडी वृत्तीमुळे देशमुख कुटुंबीयांसोबत पनवेलची इतर हिंदू कुटुंबीयांना अफ्जादीदी आपल्याशा वाटू लागल्या. त्यामुळेच नवीन पनवेलमध्ये राहणारे रवी कोळी, पनवेलमध्ये राहणारे जयंत कोळी, येथील जोशी आळीत राहून मोबाइल दुकानात काम करणारा गौरव तथा कल्पेश बहाडकर, कोळीवाडय़ातील ज्यूस दुकानाचे मालक कैलास भोईर या सर्व दादांची अफ्जा दीदी होऊ शकली.रक्षाबंधनाही दीदी कधी आपल्या घरी येणार आणि आरतीने ओवाळून हाताच्या मनगटावर राखी कधी बांधणार, याची हे भाऊ आतुरतेने वाट पाहत असतात. गौरवने याबाबत महामुंबई वृन्तात्तशी बोलताना सांगितले, की मला सख्खी बहीण नाही, मात्र मावशी व आत्याच्या मुली मला राखी बांधतात. अफ्जादीदी आणि माझे ऋणानुबंध जुळल्यापासून ती रक्षाबंधनाच्या दिवशी पहाटे सर्वात पहिले माझ्या घरी न चुकता येते. एकमेकांच्या सणांमध्ये आम्ही सामील होतोच, पण एकमेकांच्या दु:खाला आम्ही एकत्रपणे तोंड देतो. अशाच पद्धतीने सर्वानी धर्माच्या चौकटी तोडून एकत्रितपणे यावे, असे आवाहन गौरवने त्यानिमित्ताने केले आहे.Rakkh
जातिधर्मापलीकडे..
अनेक ठिकाणी  हिंदू मुस्लिमांचा वर्षांनुवर्षांचा शेजार असून तो पिढय़ान्पिढय़ांनी पाळला जात आहे. कोणताही भेदभाव न ठेवता हिंदू-मुस्लीम एकमेकांच्या सण, उत्सवात आनंदाने सहभागी होत असतात, याची अनेक उदाहरणे आहेत. अशाच प्रकारे उरण येथील मोहल्ल्यात राहणारे मुल्ला कुटुंबातील समद मुल्ला यांना त्यांच्या दोन भावांना बहीण नसल्याने मुळेखंड येथील भारती दत्ताराम म्हात्रे ही हिंदू बहीण गेली २५ ते ३० वर्षांपासून राखी बांधून भावाबद्दलचे प्रेम व्यक्त करीत आहे. आपल्याला बहीण नसली तरी भारती हीच आपली बहीण असल्याचे समद व त्यांच्या पत्नी अभिमानाने सांगतात. समद मुल्ला हे उरणमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्षही आहेत. बहिणीच्या अडचणीच्या काळात तिचा भाऊ म्हणून सदैव पाठीशी उभे राहणे, हे आपले कर्तव्यच असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. मुल्ला यांच्या मोठय़ा भावाची दहा वर्षांची मुलगी रुकय्या यानिस मुल्ला ही आपल्याच शेजारी राहणाऱ्या पाचवर्षीय आर्यन मनोज गीर या लहानग्याला आपला भाऊ मानून राखी बांधत आहे. या नव्या पिढीच्या पुढाकारानेही समाजात जातिधर्माच्या नावाने विद्वेष पसरविणाऱ्यांना ही मोठी चपराक येथील कुटुंबांनी दिली आहे. बहीण भावाचे नाते हे केवळ जन्माने नाही तर माणुसकीनेही व जातिधर्मापलीकडेही जाऊन ते वर्षांनुवर्षे टिकू शकते याची ही उरणमधील उदाहरणे आहेत.