राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिवपदासाठी विद्यापीठातील वेगवेगळ्या विभागाचे उपकुलसचिव गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले असताना वित्त व लेखा विभागाचे अधिकारी पूरण मेश्राम यांच्या पुनर्नियुक्तीमुळे कुलसचिवपदाचे समीकरण बदलले आहे.
विद्यमान कुलसचिव डॉ. अशोक गोमासे त्यांच्या मूळ पदावर जात असल्याने मार्चअखेपर्यंत ते या पदावर आहेत. त्यामुळे रिक्त होणाऱ्या पदावर दावा सांगणारे अधिकारीही विद्यापीठात रूजू होत आहेत. कुलसचिव होण्यासाठी विद्यापीठीय राजकारण रंगत असताना कुलपतींच्या निर्णयाच्या विरोधात पूरण मेश्राम यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन पुनर्नियुक्तीवर शिक्कामोर्तब करून घेतल्याची अलीकडची घडामोड आहे.
मार्चअखेपर्यंत कुलसचिवपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल याकडे अनेकांचे लक्ष आहे. विद्यापीठाच्या विद्या विभागाचे माजी उपकुलसचिव पूरणचंद्र मेश्राम, आस्थापना विभागातील उपकुलसचिव प्रशांत मोहिते आणि विकास विभागातील उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखन हे तिघेही कुलसचिवपदासाठी इच्छुक आहेत.
आस्थापना विभागाचे उपकुलसचिव प्रशांत मोहिते यांच्याकडे परीक्षा नियंत्रकपदाचा अतिरिक्त कारभार होता. विशेष म्हणजे त्यांनी ते पद मागवून घेतले होते.
मात्र विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतून आस्थापना विभागाचा कारभार सांभाळत असताना परीक्षा विभागात जाण्याच्या दगदगीचे कारण देऊन त्यांनी परीक्षा नियंत्रकपदावरून पदमुक्त करण्याचे पत्र कुलगुरूंना सादर केले. येत्या जूनमध्ये ते विद्यापीठ सेवेतून निवृत्त होत असल्याने कुलसचिव बनून निवृत्त का होऊ नये, असा निर्णय घेऊन त्यांनी परीक्षा नियंत्रकपद सोडल्याचे चर्चा विद्यापीठात आहे. कुलसचिवपदाचे दुसरे दावेदार उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखन होते.
पूरण मेश्राम यांच्याकडे वित्त व लेखाधिकारी म्हणून तर मोहिते यांच्याकडे परीक्षा नियंत्रकाचा अतिरिक्त कारभार असल्याने कुलसचिव पद आपल्यालाच मिळेल, असे गणित डॉ. हिरेखन यांनी मनोमन आखले होते. मात्र पूर्वलक्षी प्रभावाने वित्त व लेखाधिकारी म्हणून पूरण मेश्राम यांची पुनर्नियुक्ती झाल्याने त्यांचेही कुलसचिव होण्याचे स्वप्न भंग झाले.
परीक्षा नियंत्रक म्हणून होणारी धावपळ टाळण्यासाठी प्रशांत मोहिते यांना परीक्षा विभागातच एखाद्या विभागाच्या उपकुलसचिवपदी नियुक्ती मिळू शकते, अशी विद्यापीठात चर्चा आहे. तूर्त मेश्राम यांच्या पुनर्नियुक्तीमुळे कुलसचिव पदाचे समीकरण बदलले.